भांडुप संकुलातील उपाहारगृहाचे कंत्राट देण्यामध्ये सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा स्थायी समितीमध्ये शुक्रवारी उघडकीस आला. पालिकेने अलीकडेच केलेल्या सुरक्षारक्षक भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी न करताच चार प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षणार्थीच्या भोजनासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. ई-निविदा प्रक्रियेमध्ये पाच जणांनी निविदा भरली होती. गेले वर्षभर भांडुप कॉम्प्लेक्स येथे उपाहारगृह चालविणाऱ्या सचिन कॅटर्सने प्रतिदिन, प्रतिसुरक्षारक्षक १८० रुपयांमध्ये भोजन देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, आरोग्य विभागाचा परवाना नसल्याचे कराण पुढे करत हा प्रस्ताव बाद करण्यात आला आणि २५० रुपयांमध्ये भोजन देणाऱ्या सत्कार कॅटर्सला हे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जुन्या कंत्राटदाराला डावलून पालिकेचे नुकसान करणाऱ्या  या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवक प्रवीण छेडा, सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केला. हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.