दरमहा चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमधील एका कंपनीच्या दलालाने सुमारे ८८ जणांना १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कळवा पोलिसांनी त्या दलालास अटक केली आहे.
मिलिंद सावंत (२८), असे या दलालाचे नाव असून तो कळवा भागात राहतो. शेअर मार्केट एका कंपनीमध्ये तो दलालाचे काम करतो. त्याने ट्रेड मास्टर या नावाची कंपनी सुरू करून तिच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक करण्यासंबंधी योजना सुरू केली होती, त्यामध्ये मूळ रकमेवर पहिल्या आठवडय़ात पाच टक्के व्याज तसेच वर्षभरात मूळ रक्कम परत करण्यात येईल, असे आमीष त्याने दाखविले होते.
या योजनेत खारेगाव येथील रमाकांत पवार यांच्यासह अनेकांनी पैसे गुंतविले होते. तसेच पवार यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन ते एका वर्षांत परत करण्याचे आश्वासनही त्याने दिले होते. मात्र, त्याने हे आश्वासन पाळले नाही व गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिलिंद सावंत याला अटक केली आहे.
त्याने योजनेमध्ये सुमारे ८८ जणांची फसवणूक केली असून हा फसवणूकीच्या रक्कमेचा आकडा सुमारे १६ कोटी ५४ लाख २० हजार रुपयांच्या घरात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.