सायबर पोलिसांकडून दोघांना अटक
मुंबई: मराठी वधू-वर सूचक संकेतस्थळावरून महिलेशी संपर्क साधून तिची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अँटॉपहिल परिसरातून दोघांना अटक केली. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
अझर अन्सारी(२२) व राजकुमार पांडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही अँटॉपहिल परिसरातील रहिवासी आहेत. लुबाडलेली रक्कम जमा करण्यासाठी आरोपींनी बँक खाते उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. संशयीत बँक खाती बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने उघडण्यात आली होती. बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी आरोपींविरोधात कलम वाढवण्यात आले आहे.
मुख्य आरोपीने नादीमिन्ती सुधाकरा नावाने महिलेशी संपर्क साधला होता. ते एक बनावट नाव असल्याचा संशय असून याप्रकरणी मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नोव्हेंबर, २०२१ मध्ये आरोपीने महिलेशी संकेतस्थळावरून संपर्क साधला. आरोपीने तो अमेरिकेचा रहिवासी असून व्यवसायने इंटिरियर डिझायनर असल्याचे तक्रारदार महिलेला सांगितले होते. तसेच त्याच्या पत्नीचे निधन झाले असून त्याच्या सहा वर्षांच्या मुलीबरोबर राहात असल्याचेही सांगितले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेला भेटण्यासाठी भारतात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने आपल्याला दोन लाख अमेरिकन डॉलर्ससह अटक केल्याचा बनाब त्याने रचला. त्याची सुटका करण्यासाठी आरोपीच्या साथीदारांनी विविध क्रमांकावरून महिलेला दूरध्वनी केले व विविध शुल्कांच्या नावाखाली बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. या मागे सायबर भामटय़ांची टोळी असल्याचे समजेपर्यंत तक्रारदार महिलेने ४५ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये जमा केले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून यामागे मोठी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.