मुंबई : सोमय्या ग्रुपच्या विश्वस्त ९२ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून गेल्या तीन वर्षांमध्ये एक कोटी १४ लाख रुपये काढल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी याच कंपनीतील ७५ वर्षीय व्यवस्थापकाला अटक केली. आरोपी धनादेशावर वृद्ध महिलेची स्वत:च स्वाक्षरी करून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तातरित करीत होता.सोमय्या ग्रुपच्या विश्वस्त लिलाबेन कोटक पेडर रोड येथे वास्तव्यास आहेत. कांदिवली येथे राहणारा भूपेंद्र शाह हा याच कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करीत होता. गेली ४० वर्षे शाह या कंपनीत काम करीत असून समीर सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यातील व्यवहार पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.

लिलाबेन कोटक यांची धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या बँक खात्यातून शाह पैसे काढत होता. त्याच्या काही नातेवाईकांच्या बँक खात्यावर ही रक्कम त्याने हस्तांतरित केली होती. शाहने काही मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे घेतले होते. ते परत करण्यासाठी त्याने कोटक यांच्या बँक खात्यातील पैसे काढल्याचे चौकशीत उघड झाले. इतकेच नव्हे तर त्याने स्वत:च्या नातेवाईकांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठीही बनावट स्वाक्षरी केली होती. या प्रकरणी सोमय्या समुहाच्या प्रशासन विभागातील व्यवस्थापक राजीव राठोड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. गावदेवी पोलिसांनी शाह विरोधात फसवणूक आणि धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून बँक खात्यातून पैसे काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.