मुंबई : देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने ९० हजार महिलांचा मृत्यू होतो. कर्करोगामुळे दर सहा मिनिटाला एक महिलेचा मृत्यू होत असून ही आकडेवारी चिंताजनक आहे. स्तनाच्या कर्करोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर) फी माफ करणार असल्याचेही, महाजन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “…म्हणून भाजपा आणि शिंदे गटातील महिला आमदार तणावाखाली”; ठाकरे गटातील आमदाराचं विधान

जागतिक महिला दिनी कामा व आलब्लेस रूग्णालय येथे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाजन बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर, सहसंचालक अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आदी उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत स्तन कर्करोग रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

देशात स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पूर्वी ६० ते ६५ वर्षे वयातील महिलांना स्तन कर्करोग होत होता. मात्र, सध्या फास्टफूडच्या जमान्यात २५ ते ३५ वर्षे वयोगटातील महिला कर्करोगाला बळी पडत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा आजार गंभीर असून यासाठी शहरांसोबत ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचा जीव वाचावा, वेळेत निदान होवून त्वरित उपचार व्हावेत, यासाठी ही स्तन कर्करोग जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार आहे. रुग्णालयात जाण्यास महिला घाबरत असल्याने घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिलांनी न घाबरता स्तनाची तपासणी करणे आवश्यक

स्तनाचा कर्करोग हा चार स्तरांपर्यंत पसरत जातो. पहिल्या दोन स्तरांवर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णावर उपचार करणे सोपे जाते. रुग्ण वाचू शकतो. तिसऱ्या, चौथ्या स्तरावर स्तन कर्करोगाचे निदान झाल्यास शस्त्रक्रिया, केमो थेरपी, रेडिएशन यानंतरही रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. आपण स्वत:ही तपासणी करू शकतो. यामुळे महिला, मुली यांनी न घाबरता स्तनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत समुद्रात उतरवण्यात आले

बालरोग विभागाचे गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन कामा व आलब्लेस रूग्णालयात अत्याधुनिक आयव्हीएफ आणि युरो गायनॉकॉलॉजी सेंटरचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर बालरोग विभागाचे उद्घाटन आणि पाहणी करण्यात आली. स्तन कर्करोगाचे निदान त्वरित होण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या निदान केंद्राचे उद््घाटनही महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगाबाबत संपूर्ण माहिती असलेल्या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free breast cancer treatment by maharashtra government says minister girish mahajan mumbai print news zws
First published on: 08-03-2023 at 16:37 IST