अत्यंत धावपळीत व कामाच्या ओझ्याखाली दबल्याने सामान्य नागरिकांसाठी कधीच उपलब्ध नसलेले पालिकेचे कर्मचारी नेमके काय करत असतात ते उघड झाले आहे. पालिकेत कामासाठी पुरवण्यात आलेल्या इंटरनेटवरून सामाजिक माध्यमांवर टिप्पणी करण्यात व गाणी, चित्रपट डाऊनलोड करण्यात मग्न असलेले काही विभागांतील कर्मचारी दिवसाला तब्बल १४० जीबीहून अधिक डेटा वापरत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता फेसबुक, ट्विटर तसेच डेटा डाऊनलोड करता येणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.
महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक व्यवहार संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून करायचे ठरवले व त्यासाठी पालिकेच्या सर्व ६० विभागांमध्ये १५ हजारांहून अधिक संगणक व त्यासाठी इंटरनेट व काही ठिकाणी वायफाय सुविधाही पुरवण्यात आली. मात्र वेगवान नेटवर्क देऊनही पालिकेच्या अनेक विभागांमधून निविदा संकेतस्थळावर टाकताना अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक कामे लांबणीवर पडली होती. याची माहिती काढल्यावर या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात गाणी व चित्रपट डाऊनलोड होत असल्याचे दिसून आले. वायफाय दिलेल्या काही विभागांमधील दररोज तब्बल १४० जीबीपर्यंत डेटा डाऊनलोड होत असल्याचे पाहिल्यावर माहिती तंत्रज्ञान विभागाने तातडीने पावले उचलली. या विभागाचा वायफाय पासवर्ड बदलल्यावर आता डेटाचा वापर ४ जीबीपर्यंत खाली आला आहे. इतर विभागांमधील फेसबुक, ट्विटर व फाइल डाऊनलोड होऊ शकणाऱ्या इतर संकेतस्थळांवर ९ डिसेंबरपासून बंदी घालण्यात आली. पालिका कार्यालयांप्रमाणेच रुग्णालयांमध्येही मोठय़ा प्रमाणावर नेटवर्क वापरले जात असल्याने तेथेही इंटरनेटच्या वापर व प्रसारावर मर्यादा घालण्याबाबत विचार सुरू आहे.
इंटरनेट वापरावर मर्यादा आणल्याने पालिकेतील काही विभागांना आवश्यक असलेली संकेतस्थळेही पाहता येत नसल्याची तक्रार होत आहे. मात्र या संकेतस्थळांची नावे मागवून ती खुली करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वायफायचा पासवर्ड आता फक्त विभागप्रमुखांना देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना तो वापरण्यासाठी विभागप्रमुखांकडून परवानगी घ्यावी लागेल.
सध्या केवळ १५ दिवसांपुरतेच इंटरनेट वापरावर र्निबध घालण्यात आले आहेत. मात्र १५ दिवसांनी परिणामांचा आढावा घेऊन ही बंदी कायमस्वरूपीही घातली जाऊ शकते, असे माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.