संकेतस्थळ पुन्हा बंद; लाखो ग्राहकांचे प्रयत्न
अवघ्या २५१ रुपयांमध्ये फोन उपलब्ध करून देणाऱ्या रिंगिंग बेल या कंपनीचे संकेतस्थळ नोंदणीच्या दुसऱ्या दिवशीही बंद होते. फ्रीडम २५१ हा फोन बुधवारी भारतीय बाजारात दाखल झाला खरा मात्र अद्याप केवळ ३० हजार भारतीयांना याची नोंदणी करता आली आहे.
बुधवारी दाखल झालेल्या या फोनची नोंदणी गुरुवारी सकाळपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी भारतीयांनी नोंदणीसाठी संकेतस्थळावर गर्दी केल्याने संकेतस्थळ बंद पडले. यानंतर दुपारी संकेतस्थळ सुरू झाले मात्र कंपनीने नोंदणी प्रक्रिया बंद करून ती पुढील २४ तासांमध्ये सुरू करण्याचे जाहीर केले. त्यानुसार शुकवारी नोंदणीसाठी संकेतस्थळ सुरू झाले त्यावेळेस सुरुवातीला काही काळ ते चालले मात्र पुन्हा ग्राहकांनी गर्दी केल्याने संकेतस्थळ बंद पडले. संध्याकाळपर्यंत संकेतस्थळाच्या माध्यमातून केवळ ३० हजार ग्राहकांनीच नोंदणी केल्याचे समजते. दुपारी बंद पडलेले संकेतस्थळ संध्याकाळी सुरू झाले खरे मात्र त्यावर ऑर्डरचे पान सुरू होत नव्हते. यामुळे ग्राहकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. या मोबाइल कंपनीच्या विरोधात समाजमाध्यमांमधून विविध संदेश पसरविले जात असले तरी ग्राहकांचा नोंदणीचा ओढा कमी होत नसल्याचे शुक्रवारीही जाणवून आले. शुक्रवारीही गुरुवारप्रमाणेच एका सेकंदाला सहा लाख ग्राहक नोंदणीसाठी प्रयत्न करत होते.
कंपनीच्या सव्‍‌र्हरची क्षमता सहा लाख ग्राहकांएवढी नसल्याने संकेतस्थळ बंद पडत असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर आता नोंदणी केली आणि नंतर जर कुणाला फोन नको असेल तर फोन कंपनीतून बाहेर पडेपर्यंत ग्राहक पैसे परत घेऊ शकतो. यासाठीची मुदत जून महिन्यापर्यंत असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याचबरोबर याआधी कंपनीचे फोरजी सुविधा असलेल्या २९९९ रुपयांच्या फोनची ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना फोन २५ फेब्रुवारीपासून मिळण्यास सुरुवात होईल असेही कंपनीने स्पष्ट केले.