स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आत्मकथा ‘माझी जन्मठेप’ आता मोडी लिपीत प्रकाशित होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे हा ग्रंथ मोडी लिपीत प्रकाशित केला जाणार आहे. या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, मोडी लिपीला खूप जुना इतिहास आहे. बहुतांश ऐतिहासिक कागदपत्रे, नोंदी या मोडी लिपीतच करण्यात आल्या आहेत. अलिकडच्या काही वर्षांत मोडी लिपीचे महत्व कमी होत गेले आता तर ती हळूहळू लोप पावत चालली आहे. मोडी लिपी शिकण्यासाठीची काही पुस्तके मोडी लिपीत उपलब्ध आहेत. पण मोडी लिपीत साहित्यविषयक पुस्तके प्रकाशित झालेली नाही. ही उणीव भरुन काढणे, मोडी लिपीचा प्रचार व प्रसार करणे आणि मोडी लिपीचे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही हा ग्रंथ मोडी लिपीत प्रकाशित करणार आहोत.
मोडी लिपीचे अभ्यासक राजेश खिलारी आणि त्यांचे सहकारी यांनी ‘माझी जन्मठेप’चे मोडी भाषेत रुपांतर केले असून २८ मे २०१५ या दिवशी मुंबईत या ग्रंथाचे प्रकाशन केले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे १२ भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये ‘माझी जन्मठेप’ अनुवादित करण्याचे काम सध्या सुरु आहे. सावरकर स्मारकाच्या संकेतस्थळावर ते लवकरच वाचायला मिळेल.
शेखर जोशी, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom fighter vinayak damodar savarkar autobiography to be published
First published on: 05-05-2015 at 02:07 IST