काही श्वान सध्या लोकप्रिय असले तरी या श्वानांचा इतिहासही फार जुना आहे. एखाद्या देशातील फार जुन्या काळातील श्वान असल्याची ओळख अशा श्वानांची असते. फ्रान्स देशातील फ्रेंच मॅस्टिफ हे श्वानही या देशाची शान आहेत. १४ व्या शतकात दक्षिण फ्रान्समध्ये बोर्डेक्स नावाचे एक शहर होते. या बोर्डेक्स शहरात या जातीचे श्वान सुरुवातीला आढळले. बोर्डेक्स शहराच्या नावावरून या श्वानांना डॉग दे बोर्डेक्स हे नाव पडले. फ्रान्समध्ये या जातीच्या श्वानांना डॉग दे बोर्डेक्स या नावाने ओळखतात. डॉग गे बोर्डेक्स याचा अर्थ डॉग फ्रॉम बोर्डेक्स असा होतो. पहिल्यांदा १८६३ मध्ये झालेल्या एका डॉग शोमध्ये हे श्वान माहिती झाले. कालांतराने १९ व्या शतकात या श्वानांची जगभरात माहिती उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत या श्वानांची फारशी माहिती उपलब्ध नव्हती. जगभरात सध्या फ्रेंच मॅस्टिफ या नावाने हे श्वान ओळखले जातात. पूर्वी फ्रेंच राज्यकर्त्यांकडे या श्वानांचे वास्तव्य होते. या राज्यकर्त्यांनी फ्रेंच मॅस्टिफ हे या श्वानांच्या जातीकडे विशेष लक्ष दिले. अभिनेता सलमान खान याच्याकडेही मायसन आणि टायसन असे दोन फ्रेंच मॅस्टिफ जातीचे श्वान होते. बुल मॅस्टिफ किंवा तिबेटियन मॅस्टिफ या श्वानांपासून फ्रेंच मॅस्टिफ या श्वानांची उत्पत्ती आहे, असा समज आहे. रोमियो ज्युलिएटच्या काळातसुद्धा हे श्वान रोममध्ये होते, अशा काही नोंदी आढळतात. काही हॉलीवूड चित्रपटांमधूनही फ्रेंच मॅस्टिफ पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अत्यंत हुशार आणि जिद्दीचे राखणदार अशी फ्रेंच मॅस्टिफ या श्वानांची ओळख आहे. गडद सोनरी रंगात हे श्वान आढळतात. पूर्वी गुरांच्या कळपांचे रक्षण करण्यासाठी या श्वानांचा वापर होत होता. नर श्वानांचे वजन ७० किलो आणि मादी श्वानांचे वजन साठ किलो असते. या श्वानांची उंची २७ ते २८ इंच असते. भारदस्त डोके, मजबूत शरीरयष्टी असल्याने या श्वानांना पाहताच क्षणी मनात भीती निर्माण होते. यासाठी उत्तम राखणदार म्हणून या श्वानांना घरात पाळले जाते. रागीट स्वभावामुळे संकटाची चाहूल लागताच कसलीही पर्वा न करता हे आपल्या मालकाचे रक्षण करतात. दिसण्यासाठी रुबाबदार असलेल्या फ्रेंच मॅस्टिफ या श्वानांना कोणत्याही प्रकारची भीती नसते. संकटांचे आव्हान हे श्वान उत्तमरीत्या पेलतात. संकटाची चाहूल लागताच सामना करायचा असल्यास एक फ्रेंच मॅस्टिफ दोन व्यक्तीं आणि प्राण्यांवर सहज हल्ला करू शकतो. भारतामध्ये या श्वानांचे ब्रििडग फार कमी प्रमाणात होते. मुंबई, पुणे या ठिकाणी या श्वानांचे ब्रिडिंग केले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French mastiff
First published on: 17-12-2016 at 02:36 IST