कुर्ला येथील एका कॉल सेंटरची तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दांपत्याविरुद्ध विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे दांपत्य ‘पार्थ वेब सोल्यूशन’ या कंपनीचे संचालक असून त्यांनी कॉल सेंटरच्या कमिशनच्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
  अंधेरीत राहणाऱ्या स्टीफन डिसोझा यांचे कुर्ला येथे एस. मार्केटिंग नावाचे कॉल सेंटर आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशात औषधे विकण्याचे काम प्रामुख्याने केले जाते. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील पार्थ वेब सोल्यूशन या कंपनीने त्यांना आपले औषधी उत्पादन विकण्याचे कंत्राट दिले. कराराप्रमाणे त्यांना एस. मार्केटिंगला विकलेल्या औषधांवर कमिशनही मिळणार होते. सुरुवातीला नियमित पैसे दिल्यानंतर पार्थ वेबने त्यांचे पैसे थकवले. त्यांनी दिलेले धनादेशही वटले नाहीत.
याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डिसोझा यांनी विनोबा भावे पोलीस ठाण्यात तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशावरून कुर्ला पोलीस ठाण्याने पार्थ वेबचे संचालक ब्रिजेश शहा (३८) आणि त्यांची पत्नी उर्वी शहा (३५) या दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत