‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ अशा नावानं पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त ७० रुपयांचं तिकीट काढून गेलात, तर संग्रहालयाच्या नेहमीच्या दालनांखेरीज किमान चार खास-खास प्रदर्शनं पाहता येतात. त्यापैकी सर्वात ताजं- १३ जानेवारीपासून लोकांसाठी खुलं होणारं प्रदर्शन महात्मा गांधी यांच्या फोटोंचं आहे.. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठं? गांधीजींचे फोटो तर दिसतच असतात! पण हे फोटो निराळे आहेत. गांधीजींबरोबरच सेवाग्राम आश्रमात राहणारे त्यांचे चुलत-नातू कनु गांधी यांनी १९३८ ते १९४८ या काळात हे फोटो टिपलेले असल्यामुळे ते ‘घरचे’च आहेत.
या फोटोंमध्ये, गांधीजींना भेटायला येणारी माणसं, नेतेमंडळी किंवा अधिकारी.. यांच्यासह गांधी आहेतच. पण गांधीजींचे एकटय़ाचे काही फोटो आहेत.. त्यापैकी हसत फोन करतानाचा एक फोटो या प्रदर्शनाच्या निमंत्रणपत्रिकेवर, पोस्टरांवरही आहे. सूतकताई करणारे गांधी आहेतच, पण फोनवर बोलणारेही आहेत! त्याहीपेक्षा, गांधीजींच्या दैनंदिन/ कौटुंबिक आयुष्यातले काही खासगी क्षण काही फोटोंमधून दिसतात. उदाहरणार्थ, कस्तुरबा गांधी ऊर्फ ‘बा’ या गांधीजींचे पाय धूत असतानाचा फोटो. ‘मीच देते साफ करून’ अशा आविर्भावात कस्तुरबांनी पाय धरलेला आहे आणि गांधीजीही पत्नीकडे पाहात आहेत. ती सेवा करते आहे, याची जाणीव त्यांना आहे. या छायाचित्रात पाश्र्वभूमीवर सरदार पटेलही दिसतात. तेही घरचेच. साधारण १९४०च्या आसपास पत्नी आणि पती यांमध्ये जो सेवेचा बंध होता, त्याला गांधी दाम्पत्य अपवाद नव्हतं एवढं तरी या फोटोतून दिसतंच.
कनु फोटो काढतो आहे, याची गांधीजींना कल्पना असे. गांधींच्या तीन अटी होत्या. (१) फ्लॅश वापरायचा नाही (२) ‘असे उभे राहा’- पोज द्या- वगैरे काही सांगायचे नाही (३) फोटोग्राफीसाठी कधीही आश्रमातून पैसे मागायचे नाहीत. एकदा पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये, कस्तुरबा गांधी पतीच्या मांडीवर डोकं ठेवून, अखेरच्या घटका मोजत असल्याचाही फोटो कनु टिपणार होते, तेव्हा गांधीजींनीच त्यांना थांबवलं.
‘कनु गांधी’ याच नावाचे दोन नातू गांधीजींना होते, त्यापैकी एक सख्खे नातू ‘कान्हा रामदास गांधी’ ऊर्फ कनुच; ते १९२९ साली जन्मले आणि हल्लीच (नेमके ८ नोव्हेंबर २०१६ रोजी) विपन्नावस्थेत वारले. तर छायाचित्रकार आणि गांधीजींचे चुलत-नातू कनु हे १९१७ साली जन्मले व १९८६ साली निवर्तले. गांधीहत्येनंतर राजकोट येथे पत्नी आभा यांच्यासह ‘कस्तुरबाधाम’च्या कामात या कनु यांनी स्वत:ला इतके गाडून घेतले की, महात्माजी गेल्यानंतर वापरलाच न गेलेला त्यांचा कॅमेरा आणि फोटोसुद्धा कुणाच्या खिजगणतीत राहिले नाहीत. हा त्यागच, एक प्रकारचा. गांधीजी असेपर्यंत अगदी हौसेने कनु फोटोग्राफी करीत. विनोबा भावे यांचे बंधू शिवाजी भावे यांनी कनु यांच्या किशोरवयात या छंदाला प्रोत्साहन दिले होते. कनुच्या हातावर घनश्यामदास बिर्लानी आशीर्वाद म्हणून टेकवलेले १०० रुपये साधा ‘रोलिफ्लेक्स’ कॅमेरा घेण्यासाठी पुरेसे होते! पुढे छंदाचा व्याप वाढला. ‘वंदेमातरम्’ या वृत्तपत्राने तर महिना १०० रुपये मानधन देऊ केले. अन्य प्रकाशनांनाही कधी कधी कनु फोटो पुरवत. पण हे सारे केवळ कॅमेरा रोल आणि रसायनं आदींचा खर्च भागवण्यापुरते.
विस्मृतीत गेलेले कनु गांधी यांचे हे फोटो पीटर रूहे या जर्मन अभ्यासकाला आश्रमातच सापडले! मग ते पुन्हा छापून, १९९५ मध्ये जर्मनीत त्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. भारतात ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार प्रशांत पंजियार यांनी १९९७ पासून या फोटोंचा पाठपुरावा केला आणि अखेर २०११ मध्ये प्रदर्शनही भरवलं. पण २०१५ सालात या सर्व फोटोंचं ‘कनुज् गांधी (कनु यांचे गांधी)’ या नावाचं इंग्रजी पुस्तक (किंमत तीन हजार रु.) प्रकाशित करण्यातही पंजियार यांच्या ‘नजर फाऊंडेशन’चा पुढाकार होता. याच संस्थेनं मुंबईतल्या संग्रहालयात, ‘जहांगीर निकल्सन आर्ट फाऊंडेशन’च्या खास दालनात आता हे प्रदर्शन आणलं असून ते २६ फेब्रुवारीपर्यंत (तिकीट काढून) खुलं राहील.
तीनच दिवसांचं प्रदर्शन!
शहरभर काही ना काही प्रदर्शनं भरलेली आहेतच.. ‘राष्ट्रीय आधुनिक कला दालना’त (एनजीएमए) शंकर पळशीकर यांची समग्र चित्र-स्मृती जागवणारं प्रदर्शन आहे, बडोद्याचे चित्रकार अरुणांशु चौधरी यांचं प्रदर्शन वरळीच्या नेहरू प्लॅनेटोरियमनजीक ‘ताओ आर्ट गॅलरी’त भरलं आहे. सुजीत एस. एन. यांचं कुलाब्याच्या ‘साक्षी गॅलरी’तलं प्रदर्शन निराळं यासाठी की, ते फक्त तीनच दिवस आहे! का? तर मुळात हे प्रदर्शन दिल्लीतच होणार आहे.. पण मुंबईकर चित्ररसिकांनाही चित्रं पाहता यावीत, यासाठी मुंबईत राहणाऱ्या सुजीतनं गॅलरीला विनंती केली, ‘साक्षी’नंही ती मान्य केली.. ‘दुसरा मजला, ग्रँट्स बिल्डिंग, आर्थर बंदर रोड’ या पत्त्यावर आजपासून फक्त शनिवापर्यंतच सुजीतची गडद जलरंगांमध्ये प्रकाशाची तिरीप दाखवणारी आणि आखीव आकृतीरेखनातून नाटय़ निर्माण करणारी चित्रं पाहता येतील.