नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांना चालण्यास असलेल्या मोकळ्या जागांवर या फेरीवाल्यांनी ठाम मांडले आहे. येत्या १५ दिवसांत पालिका आणि सिडकोने हे फेरीवाले न हटविल्यास बेलापूर येथे आपण मौनव्रत आंदोलन करणार असल्याचा इशारा उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी एपीएमसी येथील एका कार्यक्रमात स्थानिक प्रशासनांना दिला. नवी मुंबई पालिकेचे सर्वेसर्वा आणि सिडकोवर अंकुश ठेवणाऱ्या गणेश नाईक यांना स्वपक्षाच्या सत्ताकेंद्रांना असा इशारा देण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा पंधरवडय़ाचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते शनिवारी एपीएमसी येथील माथाडी भवनाच्या सभागृहात झाला. नवी मुंबईतील ठाणे-तुर्भे मध्य रेल्वे मार्गावरील ऐरोली ते तुर्भे आणि वाशी ते बेलापूर या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथ व मोकळ्या जागांवर दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने फेरीवाला धोरण जाहीर केल्यापासून तर हे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना चालण्यास जागा शिल्लक नाही. फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकाबाहेर बसविण्याची एक मक्तेदारी तयार झाली असून काही फेरीवाले दादा तयार झाले आहेत. पालिका व सिडको प्रशासनाला अनेक वेळा सांगूनही या फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे पाहून व्यथित झालेल्या पालकमंत्र्यांना अखेर शनिवारी मौनव्रत आंदोलन करण्याचा इशारा दिला. सायन-पनवेल महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून या मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाशी टोल नाका ते बेलापूर या मार्गावर दुभाजक म्हणून मोठी भिंत घालण्यात यावी, सायन-पनवेल मार्गाप्रमाणेच ठाणे बेलापूर मार्गावर दुभाजकाच्यावर लोखंडी जाळ्या लावाव्यात असे निर्देशही त्यांनी महापौर सागर नाईक यांना  दिले.
पालिकेच्या वतीने शहरात आतापर्यंत २८४ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याची पोलिसांना मोठी मदत होत असल्याने आणखी ४०० कॅमेरे लावण्याची विनंती आयुक्त अशोक शर्मा यांनी केली. ती मान्य करण्याचे आदेश नाईक यांनी प्रशासनाला दिले. यावेळी खासदार संजीव नाईक,आमदार नरेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त विजय पाटील, पुरुषोत्तम कराड उपस्थित होते.