विनयभंगाचा आरोप असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचा पदच्युत अध्यक्ष गणेश पांडे यांचे प्रकरण सरकारने राज्य महिला आयोगाकडे दिले आहे. राज्य महिला आयोगच या प्रकरणी पुढील निर्णय घेईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत केले. राज्य महिला आयोग या प्रकरणाची चौकशी करेल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधी पक्षांसह शिवसेनेच्या महिला आमदारांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेनंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विनयभंग करण्यात आलेल्या महिलेचा वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदवावा. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारपर्यंत सभागृहात निवेदन द्यावे, असे आदेश दिले होते.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी या प्रकरणावरून सरकारवर तीव्र टीका केली. गणेश पांडे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मथुऱ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकी वेळी हॉटेलमधील खोलीत बोलावून अश्लील प्रश्न विचारणे तसेच पाठलाग केल्याची तक्रार एका महिला कार्यकर्तीने केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, मुंबईची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. या विषयावरून विरोधकांसह शिवसेनेनेही भाजपवर निशाणा साधल्यामुळे पक्ष अडचणीत सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh pandey issue inquire by ips officer rashmi shukla
First published on: 29-03-2016 at 15:57 IST