सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश विसर्जनानिमित्त भाविकांपुढे कोणतेही विघ्न उभे राहू नये म्हणून समुद्र आणि तलावांमध्ये सदैव सज्ज राहणाऱ्या जीवरक्षकांच्या सुरक्षेसाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने धाव घेतली आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या विसर्जनस्थळी तैनात असलेल्या तब्बल एक हजार जीवरक्षकांना विम्याचे कवच लाभले आहे. जीवरक्षक दगावल्यास त्याच्या नातेवाईकांना २ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळू शकणार आहे.

गणेशोत्सवात दीड, पाच, गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गिरगाव, दादर, जुहू, माहीम, वर्सोवा आदी विविध ठिकाणच्या चौपाटय़ांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. गणेशमूर्ती घेऊन गणेशभक्त समुद्रात उतरतात. काही वेळा पोहता न येणारेही भाविक उत्साहाच्या भरात समुद्रात उतरतात. अशा वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. समुद्रात उतरलेल्या भाविकांपुढे कोणतेही विघ्न उभे राहू नये, दुर्घटना घडून उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून समुद्रात, तसेच तलावांमध्ये संकटमोचक बनून जीवरक्षक तैनात असतात. पालिकेकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराचे जीवरक्षकांसोबत खासगी संस्थांचे जीवरक्षक समुद्रात सज्ज असतात. मात्र पालिकेकडून कोणत्याही स्वरूपाचे मानधन वा मोबदला न घेता गणेश विसर्जनाच्या वेळी जलसुरक्षा दल, एच २ ओ मरिन टेक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वॉटर सेफ्टी पेट्रोल, जुहू बीच लाइफ गार्ड असोसिएशन यासह विविध खासगी संस्थांचे तब्बल ५०० हून अधिक जीवरक्षक समुद्रात उभे असतात. या जीवरक्षकांना किमान विम्याचे कवच मिळावे म्हणून बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती प्रयत्न करीत होती. समन्वय समितीने यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांना आवाहनही केले होते.

‘लोकसत्ता, मुंबई’ पुरवणीमध्ये २२ ऑगस्ट रोजी ‘संकटमोचक जीवरक्षक असुरक्षित; विम्यासाठी दानशूरांचा शोध सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे समुद्रकिनारे आणि तलावांमध्ये सज्ज असलेल्या तब्बल एक हजार जीवरक्षकांचा विमा काढण्याचा निर्णय न्यासाचे नवे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी घेतला.

कुलाबा, वरळी, माहीम, वर्सोवा आदी विविध ठिकाणच्या कोळीवाडय़ांमधील तरुण गणेश विसर्जनाच्या वेळी जीवरक्षक म्हणून भूमिका बजावत असतात. या कोळी बांधवांनी आपल्याला मदत मिळावी म्हणून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाशी संपर्क साधला होता. त्यामुळे यंदा समुद्रकिनारे आणि तलावांमध्ये तैनात असलेल्या एक हजार जीवरक्षकांचा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे न्यू इंडिया एशोरन्स कंपनीमार्फत विमा उतरविण्यात आला असून त्याच्या प्रीमिअमची रक्कम भरण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विमा कंपनीला जीवरक्षकांच्या नावाची यादी देण्यात आलेली नाही. मात्र समुद्र आणि तलावांमध्ये अनुचित प्रकार घडला आणि दुर्दैवाने त्यात जीवरक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना विम्यापोटी २ लाख ५० हजार रुपये मिळू शकतील. पुढच्या वर्षी जीवरक्षकांची नोंदणी करून विम्याचे कवच देण्याचा प्रयत्न केला जाईल.

आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh visarjan 2017 life guards insurance issue
First published on: 05-09-2017 at 02:53 IST