दादर येथील बांधकाम व्यावसायिकाकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड अश्विन नाईक याच्यावर मंगळवारी ‘मोक्का’ लावण्यात आला. दुसरीकडे न्यायालयाने त्याला मंगळवारी २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या २० डिसेंबर रोजी दादर पोलिसांनी त्याला बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी अटक केली होती. मंगळवारी याप्रकरणी त्याच्यावर ‘मोक्का’ लावण्यात आला. शिवाय त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य करत नाईकच्या पोलीस कोठडीत २ जानेवारीपर्यंत वाढ केली.
दादर येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे नाईक याच्या गुंडांनी ९ डिसेंबर रोजी अपहरण केले होते. त्याला चेंबूर येथील एका कार्यालयात नेण्यात आले. त्याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी नाईकने केली होती. तसेच सध्या सुरू अससेल्या प्रकल्पात सहा हजार चौरस फूट जागेची मागणी केली होती. आपल्या मागण्या मान्य केल्या नाही, तर ठार करू अशी धमकीही त्याने दिली होती. सुरुवातीला घाबरलेल्या या बांधकाम व्यावसायिकाच्या नंतर पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत नाईकला खंडणीची उर्वरित रक्कम स्वीकारताना केली.