मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले. करोना नियमांचे पालन करण्याच्या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रात गरबा खेळण्यास निर्बंध घातले आहेत, पण सांस्कृतिक खात्याने राज्यात अन्यत्र गरबा खेळण्यास परवानगी दिल्याचे टोपे यांनी सांगितले. मोकळ्या मैदानांवर मुखपट्टय़ा, सामाजिक अंतराचे नियम आयोजकांनी पाळावेत. बंदिस्त सभागृह, हॉलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची अट राहील. करोना नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आयोजक व हॉल मालकांची राहील, असे टोपे यांनी स्पष्ट केले. नवरात्रोत्सवात मंदिरे खुली होणार असताना गरबा खेळण्यासही परवानगी मिळाल्याने यंदा नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा होईल. मात्र गरबा खेळण्याची परवानगी मुंबईतही मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मुंबईबाबतच भेदभाव का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. करोना अटी-शर्ती व नियमांचे पालन करून मुंबईतही गरबा खेळण्यास परवानगी मिळाली, अशी मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.