गोरेगावमध्ये केंद्र उभारण्यास शिवसेनेचा विरोध; मनोरंजन उद्यान विकसित करण्याची मागणी
कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया प्रकल्प संकुलाच्या आवारातच उभारण्याची सक्ती पालिकेने केली असताना गोरेगाव पूर्वेकडील पहाडी भागात या केंद्रासाठी असलेले आरक्षण रद्द करावे, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेनेच केली आहे. माजी महापौर, आमदार सुनील प्रभू यांनीच तसे पत्र त्यांनी सुधार समितीला दिले होते. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध केल्यानंतरही सुधार समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यास मंजुरी दिली.
गोरेगाव पूर्व येथील पहाडी भागात प्रभाग क्रमांक ५४ मधील आय. बी. पटेल रोडवरील १०४.३० चौ. मीटरच्या भूखंडावर ओला आणि सुका कचरा वर्गीकरण केंद्रासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसे विकास आराखडय़ात प्रस्तावित आहे. मात्र हा परिसर जास्त लोकवस्तीचा असल्यामुळे रहिवाशांच्या आरोग्यास कचरा वर्गीकरण प्रकल्प धोकादायक ठरू शकेल, त्यामुळे आरक्षण बदलून ही जागा मनोरंजन उद्यानासाठी देण्यात यावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. ही मागणी ऑगस्ट २०१८ मध्ये प्रशासनाने फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर पुन्हा हे पत्र फेरविचारार्थ पाठवण्यात आले. प्रशासनाने आता हे पत्र राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे विचारार्थ पाठवून चेंडू टोलवला आहे. हा अभिप्राय आज सुधार समितीच्या माहितीकरिता आला असता भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिवसेनेच्या मागणीचा विरोध केला.
संकुलांना धाक आणि सत्ताधाऱ्यांना मुभा
एकीकडे १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संकुलांना वर्गीकरणाची सक्ती केली जाते. अन्यथा कायद्याचा धाक दाखवला जातो, मग वॉर्डमध्ये वर्गीकरण केंद्र का नको, असा सवाल काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. भाजपचे योगीराज दाभाडकर, प्रकाश गंगाधरे यांनीही विरोध केला. काँग्रेसने मतदानाची मागणी केली, मात्र हा अभिप्राय माहितीसाठी आल्याचे सांगून अध्यक्ष दिलीप लांडे यांनी प्रस्ताव मंजूर केला.
शिवसेनेची भाजपला ‘धमकी’
शिवसेनेच्या या मागणीला भाजपच्या सदस्यांनी सुधार समितीच्या सभेत जाहीर विरोध केला. तेव्हा शिवसेनेच्या सदस्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुधार समिती अध्यक्ष यांनी भाजपच्या सदस्यांना गोड भाषेत धमकीच दिली. प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे, २०१९ मध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतीलच, असा टोला लांडे यांनी गमतीत लगावला. त्यानंतरही मुख्यमंत्री पद वाटून घ्यायचे आहे, असेही त्यांनी भाजपच्या सदस्यांना सुनावले.