तीन वर्षांत मध्य रेल्वेचा कचरा चौपटीने, पश्चिम रेल्वेचा दीडपटीने वाढला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रेल्वे मार्गालगत वाढलेल्या झोपडय़ा, प्रवाशांची कचराकुंडी सोडून इतरत्र कचरा टाकण्याची सवय यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कचरा गेल्या तीन वर्षांत चौपट झाला आहे, तर पश्चिम रेल्वेवरील कचऱ्यात दीडपटीने वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे या कचऱ्याचे विघटन करण्याची कोणतीही यंत्रणा रेल्वेकडे नसल्याने हा प्रश्न उग्र बनत चालला आहे.

सर्वच मोठय़ा शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून मुंबईही त्याला अपवाद नाही. त्याचा फटका उपनगरीय रेल्वेलाही बसत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील रुळांवर आणि लगतच्या परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यात गेल्या तीन वर्षांत चौपटीने वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील कचऱ्याचे प्रमाण दीडपटीने वाढले आहे. या कचऱ्यामुळे रुळांना धोका पोहोचतो. शिवाय पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्यासही हाच कचरा कारणीभूत ठरतो. पश्चिम रेल्वेने रुळांवर मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होणाऱ्या ३६ ठिकाणांची यादी पालिकेला दिली आहे, तर मध्य रेल्वेनेही कचरा जमा होणारी काही ठिकाणे महापालिकेला कळवली आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात कचऱ्यामुळे नदी-नाले तुंबल्याने मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर पाणई रुळांवर साठून राहते. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून दररोज रात्री कचरा विशेष गाडी चालवून रुळांवरील कचरा गोण्यांमध्ये गोळा केला जातो आणि पालिकेने ठरवून दिलेल्या जागी टाकला जातो. दररोज आठ ते साडे आठ हजार पिशव्या किंवा गोण्यांमध्ये कचरा जमा केला जातो. यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून प्रत्येकी दोन कचरा विशेष

गाडय़ा चालवल्या जातात. मात्र या कचऱ्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

कचऱ्यामुळे येणाऱ्या समस्या

* कचऱ्यामुळे रुळांची झीज होते

* रुळांखालील खडीही खराब होते

* पावसाळापूर्व नालेसफाई करूनही पुन्हा कचरा जमत असल्याने नाले तुंबून गाडय़ा रखडतात

* उंदीर, घुशींचे प्रमाण वाढते

कचरा कुठून येतो ?

* रुळांच्या बाजूची बैठी घरे, झोपडय़ा, रहिवासी इमारती, छोटे-छोटे उद्योग, व्यवसाय येथून मोठय़ा प्रमाणात कचरा रुळांवर टाकला जातो.

* लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर कचरा रुळांवर टाकला जातो. यात प्लास्टिकच्या खाद्यपदार्थाच्या पिशव्या, बाटल्या यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो.

रुळांवर कचरा साठून राहू नये यासाठी पालिकांशी चर्चा सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होणाऱ्या ३६ ठिकाणांची यादी पालिकांना देण्यात आली आहे. कचरा रुळांवर येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. 

– मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

रुळांवरील कचरा उचलण्याचे काम नेहमी रेल्वेकडून केले जाते, तरीही कचरा होतच असतो. कचरा करू नये याबाबत जनजागृतीही केली जाते. अनेक उपायही केले जात आहेत.

– सुनील उदासी, मध्य रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage on central railway as well as western railway shoot up
First published on: 01-05-2018 at 02:23 IST