अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचीही शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर भेट झाली आहे. या दोघांमध्ये बंददाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे यात काहीही शंका नाही. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली.

गौतम अदाणी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असं म्हटलं होतं. तसंच जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती या प्रकरणात योग्य असेल असंही म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट सूचक आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही. शरद पवार आणि गौतम अदाणी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते.

गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यासाठी त्यांनी कारणही दिलं आहे. एवढंच नाही तर देशात इतर प्रश्नही अदाणी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच JPC म्हणजेच संयुक्त संसदीय समितीच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडली होती. या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी आपण आपलं मत मांडलं असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांना जेपीसी हवी असेल तर माझी ना नाही असंही म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता आज गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असून आता या भेटीवरून विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.