मुंबई : घाटकोपर येथील एका बारमधील व्यवस्थापक आणि वेटर यांनी केलेल्या मारहाणीत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या मारहाणीत मृत व्यक्तीचे वडिलही जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून व्यवस्थापक व आठ वेटर्सना अटक केली.

तक्रारदार किरण लालन (६१) आणि त्यांचा मुलगा हर्ष लालन (४०) कामानिमित्त घाटकोपर येथे गेले होते. ‘हेडक्वार्टर बार व रेस्टॉरन्ट’चे मालक परिचयाचे असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते तेथे गेले. त्यावेळी हर्षने बारच्या व्यवस्थापकाकडे मालकाबद्दल विचारणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यवस्थापकाने हर्षसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर व्यवस्थापक व तेथील सात-आठ वेटर्सनी हर्षला लाथा-बुक्याने मारहाण केली. त्यावेळी तक्रारदार किरण लालन मुलाला वाचवण्यासाठी तेथे गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या हर्षला डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे उपचार करून घरी आल्यानंतर हर्ष यांचा झोपेत मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी लालन यांनी टिळक नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते पंतनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी बार व्यवस्थापक संतोष शेट्टी (४२), वेटर शाहिद अन्सारी (२४), पट्टूस्वामी गौडा, भगवान सिंह, सुनील रवाणी, राजेश यादव, सोहेल हुसैन व अमर पाटील यांना अटक करण्यात आली.