नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; २० ते २५ मिनिटांची बचत

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द दरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, नवी मुंबईतून येणाऱ्या वाहनांना पूर्व आणि पुढे पश्चिम उपनगरात पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने घाटकोपर-चेंबूर उड्डाणपूल बांधला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाल्यानंतर तो  तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

या उड्डाणपुलामुळे घाटकोपर ते मानखुर्द प्रवास वेगवान होणार असून प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. वाहनचालक-प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याने प्रवास सुखकर होणार आहे.

सायन-पनवेल मार्गाला आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा घाटकोपर-मानखुर्द रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर कायम प्रचंड वाहतूक कोंडी असते. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनचालक-प्रवासी हैराण होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने या रस्त्यावर २.९९१ किमी लांबीचा आणि २४.२ मीटररुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. ५८० कोटी रुपये खर्च करत सहा मार्गिकेच्या (उत्तर-दक्षिण) उड्डाणपुलाच्या कामाला २०१६ ला सुरुवात केली. हे काम २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी ते रखडले होते.

शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी, मोहिते पाटील नगर हे पाच महत्वाचे जंक्शन तसेच देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी.एम.जी.पी. नाला या तीन मोठय़ा नाल्यांवरून हा पूल पुढे जातो. त्यामुळे  प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका करणारा हा उड्डाणपूल अखेर खुला झाला आहे.

पालिकेचे अभिमानास्पद काम : मुख्यमंत्री

जनहिताची कामे करण्यात पालिकेचा हातखंडा आहे.  त्यानुसार हा उड्डाणपूलही उपयुक्त, जनहिताचा आहे. एक मुंबईकर म्हणून मला पालिकेच्या या कामाचा  नेहमीच अभिमान वाटतो.  पण पालिकेची कामे पाहता संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा अशी कामे आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पालिकेचे कौतुक केले. करोना संकट काळात  पालिकेने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे मुंबई मॉडेल जगभरात ओळखले जाऊ लागले. करोना साथीमुळे विकासकामे मंदावली असे म्हटले जाते, पण पालिकेची सर्व विकासकामे वेगात सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आता प्रवास सुसह्य़!

घाटकोपर-मानखुर्द रस्ता खूपच खराब झाल्याने आणि वाहतूक कोंडी प्रचंड असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे नकोसे वाटत होते. पण आता मला आणि सर्वानाच या पुलावरून रोजच यावेसे वाटेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.