जीपीओमध्ये नवीन सोव्हेनिअर विक्रीची सुरुवात; रंगीबेरंगी पोस्टकार्ड, छापलेले टी शर्ट, स्टेशनरी वस्तू उपलब्ध
रंगीबेरंगी स्टॅम्प किंवा पोस्टकार्डाची विक्री, एखादा स्टॅम्प प्रिंट केलेला टी-शर्ट किंवा जीपीओच्या देखण्या इमारतीची प्रतिकृती असलेली की-चेन अशा अनेकविध वस्तू संग्रही ठेवायला कोणालाही आवडेल. आता थेट पोस्टानेच अशा ‘पौष्टिक’ गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाऊल उचलले आहे. शुक्रवार, ५ फेब्रुवारीपासून मुंबईच्या जीपीओ येथील इमारतीत पोस्टाचे पहिलेवहिले सन्मानचिन्ह विक्री दालन उघडले असून या दालनात अनेक गोष्टी विकत घेता येणार आहेत.
ब्रिटिशांच्या काळापासून गावागावांतल्या लोकांशी जोडल्या गेलेल्या काही खात्यांपैकी एक म्हणजे पोस्ट खाते. सुरुवातीला शालांत परीक्षेचा निकालही पोस्टाने समजत असे. त्याचप्रमाणे सुखदु:खाच्या कथा-व्यथाही पोस्टामार्फतच आप्तेष्टांपर्यंत पोहोचवल्या जात असत. आजही न्यायालयाची नोटीस असो किंवा विजेचे बिल असो, पोस्टाशी सामान्य माणसांचा संबंध तुटलेला नाही. काळानुरूप तरुण पिढी पोस्टापासून थोडीशी तुटली असली, तरी अनेक पिढय़ांचा पोस्टाशी असलेला ऋणानुबंध कायम आहे.
याचीच दखल घेत पोस्ट खात्याने आता या जोडलेल्या पिढीशी नाते दृढ करण्यासाठी आणि तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी सन्मानचिन्ह विक्री दालन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी या दालनाचे उद्घाटनही मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते झाल्याची माहिती मुंबई क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रणजित कुमार यांनी दिली. या दालनात जीपीओच्या ऐतिहासिक इमारतीची छोटी प्रतिकृती असलेल्या की-चेन, त्याचप्रमाणे रंगीबेरंगी पोस्टकार्ड, काही सुप्रसिद्ध स्टॅम्प, काही स्टॅम्प छापलेले टी-शर्ट्स अशा गोष्टी विकत मिळतील. त्याशिवाय पोस्टात लागणाऱ्या इतर स्टेशनरी वस्तूंची विक्रीही या दालनात होणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. पोस्ट खाते हे पेन्शनीत निघालेले खाते नसून माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात पुढील काळात पोस्ट खात्याचे महत्त्व वाढणार आहे.जीपीओमध्ये तळमजल्यावरच हे दालन सर्वासाठी खुले असेल.
आम्ही विविध योजनांद्वारे लोकांच्या जास्तीत जास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सन्मानचिन्ह विक्री दालन हादेखील त्यातलाच एक भाग असून येथील वस्तूंची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातली असेल.
– रणजित कुमार, पोस्टमास्तर जनरल, मुंबई क्षेत्र
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2016 रोजी प्रकाशित
पोस्टात आता तरुणाईला भावणाऱ्या भेटवस्तूंची विक्री
रंगीबेरंगी पोस्टकार्ड, छापलेले टी शर्ट, स्टेशनरी वस्तू उपलब्ध
Written by रोहन टिल्लू

First published on: 08-02-2016 at 02:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gift selling in post office