मुंबई : भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला, असा कांगावा करणाऱ्या एकनाथ खडसे यांना व कुटुंबीयांना जिल्हा परिषद, दूध संघापासून लोकसभेपर्यंत अनेक पदे व उमेदवाऱ्या मिळाल्या. उलट ’तोडपाणी करणारा’ विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता, अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची हीच कर्तबगारी पाहून उमेदवारी दिली की त्यांचे मतपरिवर्तन झाले, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तर भाजपमध्ये आपल्यावर अन्याय झाला, पण शरद पवार यांनी आपल्याला हात दिल्याची भावना खडसे यांनी व्यक्त केली.

खडसे यांनी विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यावर भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यास प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, खडसे यांना आमदार, विरोधी पक्षनेतेपद, मंत्रीपद मिळाले. त्यांच्या सूनबाई खासदार आहेत. मुलाला विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. मुलगी, पत्नी यांना जिल्हा परिषद, महानंद आदी ठिकाणी पदे व उमेदवाऱ्या भाजपने दिल्या. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विविध स्तरांवर कुटुंबीयांना सत्तापदे मिळालेले खडसे हे भाजपमधील एकमेव नेते आहेत.

खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याने पुण्यातील जमीन प्रकरणात ते अडचणीत आले आणि राजीनामा द्यावा लागला. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता त्यांनीच खडसे यांना उमेदवारी दिली आहे.

खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर पवार यांचे मत बदलले आहे का, असा सवाल महाजन यांनी केला.

फडणवीसांनी निष्ठावंतांना डावलले!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलले असून आपल्यावर भाजपमध्ये अन्याय झाला, असा आरोप करीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र हात दिला, असे स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांनाही विधान परिषदेची उमेदवारी नाकारून भाजपने अन्याय केला असून त्यांचा केवळ प्रचारासाठी वापर केल्याचेही खडसे यांनी सांगितले. पूर्वी भटजी व शेठजींचा पक्ष अशी भाजपची ओळख होती. आम्ही ४० वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केले. गोपीनाथ मुंडेंनी तो बहुजनांचा केला. मात्र बाहेरच्या नेत्यांना पुढे आणून फडणवीस हे विनोद तावडे, पंकजा मुंडे व अन्य निष्ठावंत नेत्यांना बाजूला करीत आहेत. मलाही सातत्याने डावलण्यात आल्याने पक्ष सोडावा लागला. गैरव्यवहाराचे खोटे आरोप केले गेले आणि नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या, असे खडसे म्हणाले.