अक्षय्य तृतीयेचा महत्त्वाचा मुहूर्तही हुकला; व्यापारी हवालदिल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रुग्णवाढीचा आलेख टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कठोर निर्बंधांमुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही सोने खरेदी झाली नाही. सोन्या-चांदीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. सोन्याच्या दारात घसरण होऊनही ही परिस्थिती पाहायला मिळाली.

गेल्या वर्षीही पाडवा आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळेबंदी असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्यानंतर व्यापार- उद्योगांना परवानगी मिळाल्याने सोने व्यापारालाही गती येईल असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यात सोन्याचे दरही कमी होऊ लागले. परंतु कठोर निर्बंधांमुळे सोने-चांदी दुकानांना आणि मोठ्या बाजारपेठांना फटका बसला आणि या व्यापाऱ्यांपुढे मोठे अर्थसंकट निर्माण झाले. दरवर्षी सणांच्या मुहूर्तांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारात होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनेखरेदी करणे हा ग्राहकांच्या श्रद्धेचाही भाग असतो. गेली काही वर्षे सोन्याचे भाव चढे असूनही सराफ बाजार अक्षय्यतृतीयेच्या दिवशी उजळला होता. मात्र यंदा भाव कमी होऊनही उलाढाल ठप्प झाली आहे. फक्त मुंबईचा विचार करता जवळपास ८०० कोटी रुपयांचा व्यवसाय यंदा झाला नसल्याचा  अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

स्थानिक सराफा दुकानदारांकडूनही निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘करोनामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली असली तरी भविष्याची तरतूद म्हणून अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी करतात. ग्राहकांकडून फोनद्वारे मागणीही होत आहे. परंतु दुकाने खुली नसल्याने आलेल्या मागणीवर पाणी सोडावे लागत आहे,’ असे सराफा दुकानदारांचे म्हणणे आहे.

दर घसरले… करोनाकाळात

सोन्याने प्रतितोळा ५६ हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४९ हजार होता.

तोटा न भरून निघणारा… ‘या दिवशी वर्षभरातला सर्वाधिक व्यवसाय होतो. करोनामुळे कोट्यवधींचे झालेले नुकसान पुढच्या वर्षीही भरून निघणार नाही.  दिवसेंदिवस व्यवसायाचा आलेख घसरत चालला आहे,’ असे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे कीर्तिकुमार टामका यांनी सांगितले.

सोन्यातली गुंतवणूक ही तात्काळ मदत देणारी आहे. टाळेबंदीच्या काळात अनेकांनी सोने विकून उपजीविका केली. त्यामुळे भविष्याची तरतूद म्हणून लोक आजही सोने खरेदीचा पर्याय स्वीकारतात. सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना आता सोने खरेदी करायची आहे. परंतु निर्बंधांमुळे हाही मुहूर्त वाया गेला. मुंबईतील एकूण सोने बाजाराचे जवळपास ८०० कोटींचे नुकसान झाले आहे.  – दीपक देवरुखकर, पदाधिकारी – महाराष्ट्र उपनगरीय सराफी संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold market loses rs 800 crore akp
First published on: 15-05-2021 at 01:29 IST