कुलदीप घायवट
मुंबईतील विविध विकासात्मक कामांमुळे तेथील वर्षांनुवर्षे अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक जीवसृष्टीचा अंत होतोय. तेथील पशुपक्षी इतरत्र स्थलांतर करून पुन्हा नवे जीवनक्रम सुरू करतात. सध्या मुंबईत ज्याभागात हिरवळ आहे, तेथे अनेक पशुपक्षी दिसून येतात. मात्र याभागात देखील इमारतीचे पुनर्विकासाचे काम हाती घेतल्याने इतर पक्ष्यांप्रमाणे हळद्या पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे. चारकोपमधील सेक्टर क्रमांक १ ते सेक्टर क्रमांक ८ पर्यंतच्या हिरव्या झाडीत बहुसंख्य पक्षी दिसून येतात.
हळद्या हा त्याच्या विशिष्ट आणि मधुर आवाजासाठी ओळखला जातो. हळद्या संपूर्ण भारतात आढळून येत असून त्याला ‘पिळक’ म्हणून देखील ओळखले जाते. त्याला इंग्रजीत ‘ओरिओल’ म्हटले जाते. हळद्या ७ ते ९ इंच लांबीचा आणि ९ ते १२ इंच पंखांचा विस्तार असलेला मध्यम आकाराचा पक्षी आहे. सुंदर आणि आकर्षक रंगांसाठी ओळखला जातो. गडद पिवळय़ा रंगाचा आणि पंखांना आणि शेपटीला काळा रंग आणि डोळय़ाजवळ काळय़ा रंगाची पट्टी असलेला पक्षी आहे. मोकळय़ा जंगलापासून ते शहरी भागापर्यंत विस्तृत अधिवासात आढळतो. उंच झाडे असलेल्या जंगलात राहणे तो पसंत करतो. हळद्याचे घरटे मोठे आणि गुंतागुंतीचे असते. गवत, तार आणि इतर धाग्यांच्या वापर करून तो घरटे बांधतो. त्यांना एकत्र विणून लटकणारी टोपली तयार करतात. नर हळद्या घरटे बांधण्यासाठी जबाबदार पार पाडतात. चोच आणि पायाने घरटे विणतात. घरटे सहसा झाडांमध्ये उंच बांधले जाते.
हळद्या हा सर्वभक्षी पक्षी असून कीटक आणि फळे दोन्ही खातो. त्यांचा आहार ऋतुमानानुसार बदलतो आणि त्यांना आवश्यक पोषक तत्वे पुरवणारे विविध पदार्थ ते खातात. हळद्या फळे, कीटक यासह विविध खाद्यपदार्थ खातात. संत्री, केळी, पपई, द्राक्षे, खरबूज यासारखी मऊ, रसाळ फळे पसंत करतात. विविध प्रकारचे कीटक, कोळी, सुरवंट, टोळ, मुंग्या, माशा आणि पतंग यांसारखे कीटकही त्यांचे खाद्य आहे. हळद्या हे ‘कीटक नियंत्रक’ म्हणून ओळखले जातात आणि ते कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हळद्याचा विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढऱ्या रंगाची अंडी देते. पिल्लांचे संगोपन नर-मादी दोघे मिळून करतात. हळद्या जंगलात साधारणपणे १० वर्षांपर्यंत जगू शकतात. परंतु, त्याचे सरासरी आयुष्य हे सुमारे ४ ते ५ वर्षे असते. त्यांचे आयुर्मान निवासस्थान नष्ट होणे, शिकार करणे आणि रोग यासारख्या घटकांमुळे प्रभावित झाले आहे. निसर्ग आणि मानवसृष्टीसाठी हळद्याचे निवासस्थानांचे संरक्षण करणे आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे झाले आहे.