बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड गुरू साटमच्या पुतण्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. पंकज साटम (३२) असे या गुंडाचे नाव असून तो मुंबईत गुरू साटमसाठी खंडणी उकळण्याचे काम करीत होता.
परदेशातून कॉल करणाऱ्या साटमने या व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागून आपल्या स्थानिक माणासशी पुढील व्यवहार करण्यास त्याने सांगितले.
यानंतर  साटमचा पुतण्या पंकज  हा नाव बदलून या व्यावसायिकाला विविध पीसीआोवरून दूरध्वनी करत होता. यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण १) धनंजय कुलकर्णी यांनी एका विशेष पथकास प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सांगितले. पोलिसांनी व्यावसायिकाला या गुंडाशी वाटाघाटी करण्यास सांगितले आणि १० लाख रुपये स्वीकारण्यास साटम तयार झाला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी साटम याला ही रक्कम घेताना  दादर भागात शिताफीने अटक केली.