scorecardresearch

“इथं आझाद मैदानावर तुमचे हजारो बाप आणि…”, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.

“इथं आझाद मैदानावर तुमचे हजारो बाप आणि…”, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. “सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन झालंय, आम्ही बोलायचं कुणाशी. अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत त्यांच्याशी येऊन बोला ना,” असं आक्रमक मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन गोष्टी सांगत असल्याचा आरोप केला. तसेच असं असूनही एसटी कर्मचारी सरकारचे बाप निघाले, असं म्हटलं.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आम्ही तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असं म्हणत नाही, तर पर्याय पण देतोय. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसं मिळू शकतं हे सांगितलं. आम्ही फक्त बोलत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या ७ तारखेला झाले पाहिजे. एक दिवस सुद्धा पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही राज्य सरकारमध्ये आम्हाला घेऊ शकता. हे कष्टकरी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो. पण यांना तो भ्रष्टाचार थांबवायचा नाही. त्यांचा जीव तिथं अडकला आहे.”

“अरे बोलायचं कुणाबरोबर इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत”

“एसटी कर्मचाऱ्यांनी ताकदीने या आंदोलनात भाग घेतल्यामुळे आज सरकारच्या नाकीनऊ आलाय. सरकारला काही सुचेना. त्यांना काय करावं कळेना. काल तर त्यांनी हे आंदोलन नेतृत्वहीन झालंय असं म्हणत आम्ही बोलायचं कुणाशी असं विचारलं. अरे बोलायचं कुणाबरोबर इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत त्यांच्याशी येऊन बोला ना. मी आझाद मैदानावर बोलत असताना माझा आवाज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जात असेल आणि त्यांना ऐकू येत असेल तर तो आवाज या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

“एसटी कर्मचारी सरकारचे बाप निघालेत”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोला. मागणी एकच आहे, ती म्हणजे विलिनीकरणाची, दुसरी तिसरी चौथी पाचवी काही नाही. सरकार दररोज चॅनलच्या माध्यमातून नवीननवीन काही तरी सांगतंय. पण तुम्ही सरकारचे बाप निघालात, एसटी कर्मचारी डगमगायला तयार नाहीत.”

हेही वाचा : “अनिल परबांना एसटी कर्मचारी आंदोलनात उद्रेक घडवायचा आहे”, गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप!

“आतापर्यंत ड्रायव्हर आणि कंडक्टर भित्रा होता. काही नोटीस आली की तो एसटीत जाऊन बसायचा. ती एसटी कितीही वाजूदे, त्यात ऑईल असू दे नसू दे यांची गाडी सुसाट चालू व्हायची. आता चालक, वाहक घाबरायला तयार नाही. तुम्ही काहीही करा, आम्हाला विलिनीकरण पाहिजे या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम राहिले,” असंही पडळकरांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या