डॉक्टरांची वानवा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा भोंगळ कारभार

राज्याच्या शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये डॉक्टरांची वानवा असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही भोंगळ कारभार असल्याचे ताशेरे राष्ट्रीय आरोग्य अभियानाने ओढले आहेत. अभियानाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ११ व्या संयुक्त आढावा (कॉमन रिव्ह्य़ू) अहवालामधून हे निदर्शनास आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाने देशभरातील १६ राज्यांमधील प्रत्येकी दोन जिल्ह्य़ांचे सर्वेक्षण करून ११ व्या संयुक्त आढावा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा आणि परभणी जिल्ह्य़ातील सरकारी वैद्यकीय सेवेचा आढावा घेण्यात आला आहे.

राज्यातील सरकारी वैद्यकीय सेवेमध्ये डॉक्टरांची वानवा तर आहेच, शिवाय वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात कमतरता आहे. यामध्ये परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची मोठय़ा प्रमाणात कमतरता आहे, असे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे, तेथे भूलतज्ज्ञाची नेमणूकच केलेली नाही. जिल्हा रुग्णालयांमध्ये दोन दंत डॉक्टरांची नियुक्ती केली आहे, तर त्या ठिकाणी दंत उपचार करण्यासाठी एकच खुर्ची उपलब्ध केलेली आहे. जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये उपकरणांचीदेखील वानवा आहे. २९१ दंत डॉक्टरांच्या मागे केवळ २५५ दंत उपचार करणाऱ्या खुच्र्या दिल्या गेल्या आहेत, असे या अहवालातून निदर्शनास आणत राज्यातील शासकीय वैद्यकीय सेवेचे वास्तव उघड केले आहे.