scorecardresearch

पां. वा. काणे यांचे संशोधनकार्य पुढे नेण्याची गरज : राज्यपाल

एशियाटीक सोसायटी तसेच पोस्ट विभागाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन

मुंबई : भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र आणि भारतीय संस्कृती याविषयी केलेले संशोधनकार्य थक्क करणारे आहे. त्यांनी देश, समाज आणि संस्कृतीचा गौरव वाढविला. त्यामुळे विद्यापीठे, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी संकल्प करून त्यांचे कार्य पुढे न्यावे. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी केले.

  थोर धर्मशास्त्र संशोधक  पांडुरंग वामन काणे यांच्या ५०व्या स्मृतीदिनानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. 

विद्यापीठांमध्ये आता आंतरशाखीय अध्ययनाचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे संशोधकांनी काणे यांचे ग्रंथ अभ्यासावे. त्यातून समाजाला उत्तम नेतृत्व लाभेल, असेही राज्यपालांनी नमूद केले.

एशियाटीक सोसायटी तसेच पोस्ट विभागाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

एशियाटीक सोसायटी तसेच टपाल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर, सोसायटीच्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया, विश्वस्त डॉ. भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, सोसायटीच्या कार्यवाहू मानद सचिव मंगला सरदेशपांडे तसेच काणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सूरज पंडित यांनी काणे यांच्या कार्याचा परिचय करून दिला, तर मंगला सरदेशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

एशियाटीक सोसायटी संकटांवर मात करेल

सार्वजनिक जीवनात वावरत असतानाही आपण पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जोपासलेल्या व्यासंगाचा विचार करतो त्यावेळी हे कुणी अवतारी पुरुषच असावे असे आपल्याला वाटते, असे नमूद करून एशियाटीक सोसायटीमध्ये बसून त्यांच्यासारख्या महान लोकांनी तपस्या केली आहे. त्यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली एशियाटीक सोसायटी सर्व संकटांवर मात करून अवश्य तगेल, याबद्दल आपण आश्वस्त आहोत, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Governor bhagat singh koshyari pay homage to pandurang vaman kane zws

ताज्या बातम्या