नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री दीड वाजेपर्यंतच रेस्टॉरंट- बार सुरू राहतील या आपल्या आदेशावर आपण ठाम असल्याचे सांगत त्यात कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही आणि या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.
महिलांची सुरक्षा आणि मद्यपी चालकांवर वचक बसविण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातही मंगळवारी याच भूमिकेवर ठाम राहणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. सिंह यांच्या आदेशाविरोधात ‘आहार’ने उच्च न्यायालयात धाव घेतली असून मंगळवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  मुंबई पोलीस आयुक्तांच्या पावलावर पाऊल ठेवत ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीही हॉटेल्स-बार खुली ठेवण्याच्या वेळमर्यादेबाबत सारखाचफतवा काढला आहे.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी रात्रभर लोकांना रस्त्यावरून फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला नाही, असे आणखी एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र त्याच वेळी मध्यरात्री ध्वनिक्षेपक वा संगीत वाजविण्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदी असल्याचे या अधिकाऱ्याने प्रामुख्याने नमूद केले. वेळेबाबत  मर्यादेचे उल्लंघन करण्यात आल्यास दंडाची वा परवाना जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची वेळ शिथिल करण्याच्या योजनेला गेल्या वर्षीही मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी विरोध केला होता.