नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पालिकेकडून नियमावली?

करोनामुळे या वर्षी सर्वच सण आणि उत्सव साजरे करण्यावर बंधने आली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : नाताळ आणि ३१ डिसेंबरला नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून  सोमवारी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. करोना प्रादुर्भावामुळे सण-समारंभांवर बंधने असताना मोठय़ा संख्येने लोक नाइट क्लबमध्ये जमत असल्यामुळे नाताळ, नववर्षांला संचारबंदी किंवा नियमावली आणण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले होते. २० डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

करोनामुळे या वर्षी सर्वच सण आणि उत्सव साजरे करण्यावर बंधने आली. राज्य सरकार आणि महानगरपालिकेने नियमावली तयार करून त्यानुसार सण साजरे करण्याची परवानगी दिली होती. आतासुद्धा कोणत्याही समारंभासाठी ५० पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंधने आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसांत पालिके ने विविध नाइट क्लब व हॉटेलांवर घातलेल्या छाप्यांत मोठय़ा संख्येने लोक मुखपट्टय़ांविना जमले असल्याचे आढळून आले होते. पहाटेपर्यंत हे नाइट लाइफ सुरू असल्याचे पालिकेच्या लक्षात आले. आतापर्यंत पाच पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.

त्यामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याची विनंती पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. संचारबंदी लागू करण्याच्या मन:स्थितीत राज्य सरकार नाही, पण लोकांनीही वेळीच सावध व्हावे, असा इशाराच आयुक्तांनी दिला होता. २० डिसेंबपर्यंत परिस्थिती पाहून नाताळ व ३१ डिसेंबरसाठी नियमावली तयार करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले होते. त्यामुळे सोमवारी याबाबत पालिकेकडून नियमावली जाहीर होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

फटाक्यांवर निर्बंधांची शक्यता..

दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी होती. नववर्षांच्या स्वागतासाठीही मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होते. त्यामुळे या आतषबाजीवरही यंदा बंदी येण्याची शक्यता आहे. तसेच प्रार्थनास्थळे, धर्मस्थळे आता सुरू झाली आहेत. मात्र, नाताळ साजरा करण्याबाबतही काही नियमावली तयारी केली जाण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Guidelines issued from bmc for christmas and new year celebration zws