‘लोकसत्ता अर्थभान’मध्ये बोरीवलीत उद्या गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन

इंधन दरवाढीपासून व्यापारी संपापर्यंत या ना त्या कारणाने वाढणारी महागाई आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत महिन्याच्या जमाखर्चाचा समतोल साधतानाच वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी आवश्यक परतावा देईल, अशी गुंतवणूक कशी करता येईल, हे जाणून घेण्याची संधी चालून आली आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ हा कार्यक्रम शुक्रवारी बोरीवलीत होत असून त्यात तज्ज्ञांकडून याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.

बोरिवली पश्चिमेकडील सावरकर उद्यानाजवळील सेंट अ‍ॅम्स हायस्कूल येथे शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता ‘लोकसत्ता अर्थभान’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत. यानिमित्ताने उपस्थितांना आपल्या गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन तज्ज्ञांकडून करून घेण्याची संधी उपलब्ध आहे.

उत्पन्न, खर्च आणि शिल्लक यांचे योग्य प्रमाण राखून परताव्यासह भविष्यातील आर्थिक तजवीजबाबत सनदी लेखापाल तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यातील सध्याच्या लाभ तसेच करमात्रा याचे सविस्तर विवेचन यावेळी त्यांच्या ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे होईल.

भांडवली बाजारातील जोखीम लक्षात घेता म्युच्युअल फंड या गुंतवणुकीच्या अन्य पर्यायावर यानिमित्ताने अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे प्रकाश टाकतील. भांडवली बाजाराचा फंडांशी येणारा संबंध, फंडांची परताव्याबाबतची हालचाल तसेच फंडांचे प्रकार आदी मूलभूत माहितीबाबत ते यावेळी त्यांच्या ‘म्युच्युअल फंड : गुंतवणूक फायद्याची’ या विषयाद्वारे भाष्य करतील.

वक्ते

तृप्ती राणे : अर्थनियोजनाचा श्रीगणेशा

कौस्तुभ जोशी : म्युच्युअल फंड : गुंतवणूक फायद्याची

कधी

शुक्रवार, ३० नोव्हेंबर २०१८

सायंकाळी ५.४५ वाजता

कुठे

अ‍ॅम्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ, बोरिवली (पश्चिम)