टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोर्टाने रौफला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती तसेच खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. अब्दुल रौफची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांची आणि हत्येनंतर बराच काळ फरार असल्याची दखल घेत उच्च न्यायालयाने जन्मठेपे शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची माफी मिळण्यास आरोपी पात्र नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने गुलशन कुमार यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी रमेश तोरानी यांची निर्दोष मुक्तता केली.

१२ ऑगस्ट, १९९७ रोजी जुहूमधील जीत नगर येथील मंदिरातून बाहेर येताना टीव्ही मालिकेचे संगीतकार गुलशन कुमार यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. तीन हल्लेखोरांनी कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचा साथीदार, अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला २००२ मध्ये कुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

हे ही वाचा >> ‘सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है!’ राकेश मारियांना आधीच मिळाली होती टीप

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात २६ आरोपींची नावे आहेत. कुमार यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसानंतर संगीतकार नदीम अख्तर सैफी हे या प्रकरणात सह-सूत्रधार असल्याचे समोर आले होते. टिप्स कॅसेटचे मालक रमेश तोरानी यांनी हत्येप्रकरणी अटक केली होती. हत्येनंतर सैफी हा ब्रिटनमध्ये स्थायिक झाला.

२००९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पॅरोल मंजूर केला असताना मर्चंट बांगलादेशात पळून गेला होता. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश केल्यामुळे त्याला बांगलादेशात अटक करण्यात आली आणि पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पहिल्या शिक्षेची पूर्तता झाल्यानंतर दहशतवादी संबंधांवरून डिसेंबर २०१४ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. यानंतर त्याला बांगलादेशने भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले.