राजकीय संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांनी गुरुवारी आपली नाराजीची तलवार म्यान केली असून, पक्षाच्या विविध पदांचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. कामत यांनीच एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली.
अग्रलेख : दिवाळखोरांचे दातृत्व
दोन आठवड्यांपूर्वी कामत यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देत सक्रीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. पक्षाचे नेते आणि समर्थकांना पाठविलेल्या संदेशात राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी जमून नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर कामत यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. खुद्द अहमद पटेल हे कामत यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न करीत होते. या सर्व पार्श्वभूमीवर मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा सल्ला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मला दिला. त्याचबरोबर सोनिया गांधी यांची भेट घेतल्यावर देशातील लोकांची सेवा करण्यासाठी काँग्रेसच उत्तम पर्याय असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे कामत यांनी निवेदनात म्हटले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आपण यापुढेही कार्यरत राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.