प्राध्यापकांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांना निलंबित केल्याचे तीव्र पडसाद शिक्षणतज्ज्ञांपासून विद्यार्थ्यांपर्यंतच्या सर्व घटकांतून उमटू लागले आहेत. हातेकर यांच्यावरील कारवाई म्हणजे विद्यापीठाची ‘बौद्धिक दिवाळखोरी’ असल्याची टीका करत अनेकांनी विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत, तर खुद्द हातेकर यांनी या प्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाच्या बदनामीचे कारण पुढे करत आणि व्यवस्थापन परिषदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुलगुरूंनी डॉ. हातेकर यांना लक्ष्य केल्याची चर्चा सध्या मुंबई विद्यापीठात आहे. परिषदेच्या २० डिसेंबरला झालेल्या बैठकीत काही सदस्य प्राध्यापकांनी डॉ. हातेकर यांना बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करण्यास विरोधही दर्शविला होता, मात्र आधीच पढवून ठेवलेल्या काही सदस्यांसमोर या प्राध्यापकांचा आवाज क्षीण पडला. परिणामी कारवाईचा मुद्दा कुलगुरू वेळुकर यांना पुढे दामटता आला, अशी माहिती समोर आली आहे, मात्र निलंबनापूर्वी डॉ. हातेकर यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही, हे विशेष.  
डॉ. हातेकर यांच्यावर विद्यापीठाने ज्या तत्परतेने कारवाई केली त्याच तत्परतेने त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचा खुलासा करण्याची तसदी विद्यापीठाने घेतलेली नाही. डॉ. हातेकर यांनी आपले आक्षेप विद्यापीठाच्या विविध यंत्रणांकडे नोंदवायला हवे होते, असे स्पष्टीकरण या कारवाईचे समर्थन करणाऱ्यांकडून दिले जात आहे, मात्र डॉ. हातेकर यांनी गेली दोन वर्षे सातत्याने या बाबी कुलगुरूंसह विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरील नियुक्त्या कशा बेकायदेशीर आहेत, याबाबतच्या त्यांच्या तक्रारीची दखल तर खुद्द राज्यपालांनीही घेतली होती. आचारसंहिता भंगाची कारवाई करताना डॉ. हातेकर यांचे वर्तन शिक्षकाला साजेसे नव्हते, असे संदिग्ध कारण विद्यापीठाने दिले आहे.
कारवाईबद्दल मान्यवरांचे कुलगुरूंवर टीकास्त्र
“मुळात आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवण्यासाठी जी कारणे दिली आहेत, त्या प्रकारचे वर्तन माझ्या हातून कधीच झालेले नाही, त्यामुळे या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.”
डॉ. नीरज हातेकर

मान्यवरांच्या प्रतिक्रिया..
“डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाई लोकशाहीविरोधी आहे. एखादी व्यवस्था निरोगी व निकोप राहावी यासाठी त्यातील त्रुटी दाखवून देणे, हे चुकीचे कसे ठरते? खुद्द वेळूकर यांनी आपल्या निवड प्रक्रियेच्या वेळी निवड समितीला चुकीची माहिती दिली होती. “
प्रा. पुष्पा भावे, सामाजिक कार्यकर्त्यां
“डॉ. हातेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे सौजन्य कुलगुरू वेळूकर यांनी दाखविलेले नाहीच. उलट स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे कुलगुरू त्यांच्याशी सूडबुद्धीने वागले आहेत. ”
डॉ. अरुण टिकेकर, ज्येष्ठ पत्रकार   
“शिक्षणसंस्थेतील गैरव्यवहार, भ्रष्टाचार याविषयीची मते दडपण्याचा प्रयत्न अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आणणारा आहे. मुळात प्राध्यापकावरच काय, तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यालाही त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय काढून टाकण्याचा अधिकार व्यवस्थापन परिषदेला वा कुलगुरूंना नाही.”  
*डॉ. द. ना. धनागरे, माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ