‘पंछी उड चुका’, ‘मेहमान आ रहा है’..

मुंबईमध्ये साधारण एक लाखाच्या आसपास फेरीवाले असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

फेरीवाले,hawkers

कारवाई पथकाच्या आगमनाची फेरीवाल्यांना सांकेतिक सूचना

गजबजलेल्या रस्त्यावर अचानक सुरू झालेली फेरीवाल्यांची पळापळ हे दृश्य आपल्याला नवीन नाही. पालिकेचे अधिकारी-कर्मचारी आले असल्याने ही धावाधाव सुरू झाल्याचे संकेत आपल्यालाही तेव्हा समजतात. पण फेरीवाल्यांच्या साखळी यंत्रणेतील अनेक संकेत असे आहेत जे सर्वसामान्याला समजतही नाहीत. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणाऱ्या त्यांच्या ‘रक्षकां’नी वर्षांनुवर्षे सांकेतिक शब्दांच्या मदतीने ‘समन्वया’चा सेतू उभारला आहे. ‘पंछी उड चुका..’, ‘मेहमान आ रहा है..’, ‘जल्दी करो, गाडी मिस हो जाएगी..’ असे इशारे देऊन फेरीवाल्यांना सावध करण्यात येते.

मुंबईमध्ये साधारण एक लाखाच्या आसपास फेरीवाले असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र मुंबईमध्ये सुमारे साडेतीन लाखाच्या आसपास फेरीवाले असल्याचा दावा फेरीवाल्यांच्या संघटनांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या या फेरीवाल्यांची वार्षिक उलाढाल प्रचंड आहे. भुलेश्वर, दादर, अंधेरी, बोरिवली आदी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बिनदिक्कत आपला व्यवसाय करता यावा यासाठी स्थानिक राजकीय कार्यकर्ता, समाजसेवक, गुंड अथवा फेरीवाल्यांमधील एखादी जुनीजाणती व्यक्ती त्यांचे ‘रक्षक’ बनले आहेत. फेरीवाल्यांवर कोणतीही आफत येऊ नये यासाठी ‘रक्षक’ मंडळी कायम काळजी घेत असतात. त्या बदल्यात फेरीवाले त्यांना हप्ते देतात. यातील ठरावीक रक्कम सरकारी यंत्रणांमध्ये झिरपते तर उरलेल्या पैशांवर रक्षकांचे दुकान चालत असते. पदपथ, रस्त्यांवर पथाऱ्या पसरून व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयामार्फत कारवाई होते. कारवाई करणाऱ्या गाडीमध्ये निरीक्षक, कामगार, आणि चालक यांचा समावेश असतो. पथक रस्त्यावर दिसणाऱ्या फेरीवाल्याचे साहित्य जप्त करते. त्यानंतर दंडात्मक कारवाई करून ते त्यांना परत केले जाते. मात्र अनेकदा पालिकेची कारवाई करणारी गाडी जुजबी सामान जप्त करून परत येताना दिसते. मात्र ‘रक्षकां’ना सूचना मिळते. ‘पंछी उड चुका..’, ‘मेहमान आ रहा हैं..’ असे काही सांकेतिक शब्द वापरून सावध केले जाते.

हा ‘रक्षक’ फेरीवाल्यांपर्यंत निरोप पोहोचविण्याचे काम करतो आणि त्यानंतर फेरीवाले आपले साहित्य लपवून ठेवतात. रस्त्यावर फेरीवालाच दिसत नसल्याने कारवाई करणारी गाडी एक चक्कर मारून निघून जाते. केवळ हप्ता न देणाऱ्या फेरीवाल्यांना मात्र कारवाईला सामोरे जावे लागते.

मोटरसायकलवरून टेहळणी

पालिकेची गाडी कारवाई करण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडताच फेरीवाल्यांचे ‘रक्षक’ या वाहनाची टेहळणी करीत फिरत असतात. पालिकेची गाडी ज्या ठिकाणी पोहोचणार, तेथील फेरीवाल्यांना मोबाइलवरून संपर्क साधून सावध करण्याचे काम मोटारसायकलवरील मंडळी करीत असतात. पालिकेची गाडी येण्याचा निरोप मिळताच फेरीवाले आपले साहित्य हटवून पदपथ मोकळा करतात. जवळची दुकाने, इमारती, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी आपले सामान लवपून फेरीवाले पालिकेची गाडी निघून जाण्याची वाट पाहतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hawkers issue bmc action squad on hawkers bmc