मुंबई : अपघातातील गंभीर रुग्ण, हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती किंवा अन्य काही कारणास्तव प्रकृती गंभीर असलेला रुग्ण शुश्रूषागृहात आल्यास त्याची आर्थिक परिस्थिती न पाहता त्याच्यावर प्राधान्याने उपचार करावेत. त्यानंतरच त्याला जवळील मोठय़ा रुग्णालयात हलवावे, अशा सूचना आरोग्य संचालनालयाने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’बरोबर (आयएमए) नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या.
‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’संदर्भात आरोग्य संचालनालय आणि आयएमए यांच्यात प्रत्यक्ष आणि दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीला राज्यातील १७० पेक्षा अधिक ‘आयएमए’सदस्य उपस्थित होते. ‘‘शुश्रूषागृहांमध्ये गंभीर स्थितीत आलेल्या रुग्णावर प्राधान्याने उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यावर भर द्यावा. हे प्राथमिक उपचार करताना रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार करू नये. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय चिठ्ठीसह पाठवावे. ‘गोल्डन अवर’ उपचार पद्धतीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आरोग्य संचालनालयाने ‘आयएमए’ला केल्या.




राज्यातील प्रत्येक शुश्रूषागृहाने त्यांच्या सेवेच्या व्याप्तीनुसार प्रशिक्षित वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन मुलभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. आपत्कालीन आणि आपत्तीमधील रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक शुश्रूषागृहाने आपल्या सुविधा आणि कौशल्यक्षम तज्ज्ञ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना संचालनालयाने केल्या. सुश्रुषागृहामध्ये आपत्कालीन सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध करण्याबाबतही आरोग्य संचालनालयाने निर्देश दिले आहेत.
काही नियमांमध्ये बदलाची मागणी
गंभीर अवस्थेत आलेल्या कोणत्याही रुग्णाला प्राथमिक उपचार करणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही चोख बजावू. मात्र, हृदयविकाराचा झटका आलेला एखादा रुग्ण किंवा अपघातात हात, पाय मोडलेल्या रुग्णाला जवळच्या सुश्रुषागृहामध्ये नेण्यात आल्यावर तेथे हृदयविकार विभाग किंवा अस्थिरोग विभाग नसल्यास रुग्णावर योग्य उपचार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत त्याला सुश्रुषागृहात ठेवण्याचा नियम शिथिल करण्यात यावा. तसेच एखाद्या सुश्रुषागृहात तीन ते चार खाटा असल्यास गंभीर रुग्णाला खाट उपलब्ध करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही अट ५० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांसाठी करण्यात यावी, अशी विनंती ‘आयएमए’ने केल्याची माहिती ‘आयएमए’चे सचिव संतोष कदम यांनी दिली.
दर्शनी भागात शुल्क फलक आवश्यक
सुश्रुषागृहांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचे शुल्क हे दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करण्याची सूचना आरोग्य संचालनालयाने ‘आयएमए’ला केली. प्रवेश शुल्क, खाटा आणि अतिदक्षता विभागाच्या प्रत्येक दिवसाचे शुल्क, डॉक्टर, सहाय्यक डॉक्टर, भूलतज्ज्ञांचे शुल्क, शस्त्रक्रियागृहाचे शुल्क, परिचारिका शुल्क, मल्टीपॅरामीटर मॉनिटर शुल्क, रोगनिदानशास्त्र शुल्क, प्राणवायू शुल्क, क्ष किरण आणि सोनोग्राफी शुल्क याबाबत तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश संचालनालयाने दिले.