scorecardresearch

प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याने रुग्णसंख्येत वाढ ; आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज

लसीकरणामुळे शरीरात निर्माण झालेली करोनाविरोधातील प्रतिपिंडांचा स्तर हळूहळू खालावत जाऊन त्यांचा प्रभाव कमी झाला आहे.

health experts opinion on patients corona
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, करोनाचा नवा उपप्रकार निर्माण झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्याला तोंड देण्यासाठी शरीरातील प्रतिपिंडाचा स्तरही सध्या खालावला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.

लसीकरणामुळे शरीरात निर्माण झालेली करोनाविरोधातील प्रतिपिंडांचा स्तर हळूहळू खालावत जाऊन त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी करोनाचा नव्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.  शरीरात रोगाशी लढा देणाऱ्या पेशींच्या स्मृतीमध्ये करोनाविरोधी प्रतिपिंडे अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर ही प्रतिपिंडे विषाणूचा परिणाम कमी करण्यासाठी पुन्हा सज्ज होतील. मात्र करोनाच्या नव्या उपप्रकारामध्ये काही वेगळे गुणधर्म असल्याने ही प्रतिपिंडे सतर्क होण्यास थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, मात्र नागरिकांच्या शरीरात असलेल्या प्रतिपिंडामुळे यापुढे करोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण फारच अल्प असेल. त्यामुळे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे, असे डॉ. जगियासी यांनी सांगितले.

नागरिकांना लस घेऊनही बराच कालावधी झाला आहे. त्यामुळे करोनाचा नवा उपप्रकार असल्यास त्याचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या शरीरात असलेल्या प्रतिपिंडाना सतर्क होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम करोना रुग्ण संख्या वाढीवर होऊ शकतो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 02:39 IST

संबंधित बातम्या