मुंबई : लोकांची जीवनशैली व आहार शैलीत बदल होत असल्याने मागील काही वर्षांपासून हृदयरोगांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये साधारणपणे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्याशी संबंधित औषधांच्या विक्रीमध्येही मागील काही वर्षांमध्ये ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती औषध विक्रेता संघटनांकडून देण्यात आली आहे.
फार्मारॅक या खासगी कंपनीच्या अहवालानुसार मागील पाच वर्षामध्ये हृदयरोगाच्या औषधांच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून २०२१ मध्ये हृदयविकाराशी संबंधित १ हजार ७६१ कोटी रुपयांची विक्री झाली होती. ती यंदा २ हजार ६४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या अहवालामध्ये रक्तातील कोलेस्टेरोल कमी करणारी, हृदयविकाराचा झटका टाळणारी आणि हृदयविकारामधील वेदना कमी करणाऱ्या औषधांची विक्री ही अन्य आजारांच्या तुलनेत अधिक होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.
भारतात हृदयविकाराच्या घटनांमध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मुख्यत्वे खराब जीवनशैली, वाढता ताण, हवा आणि जल प्रदूषण यासारख्या बिघडत्या पर्यावरणीय घटकांमुळे आहे. करोनानंतरच्या काळात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या हृदयरोगाच्या समस्या देखील बिकट झाल्या आहेत. परिणामी, गेल्या ५ वर्षांत भारतात हृदयरोगाच्या औषधांच्या वापरात किमान ५० टक्के वाढ झाली आहे. विशेषतः एस्पिरिन आणि क्लोपीडोग्रेल सारख्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या वापरात, लिपिड नियंत्रणासाठी स्टॅटिन, बीटा-ब्लॉकर्स आणि अँटी-ॲरिथमिक्स. प्रिस्क्रिप्शन आणि उत्पादनात या औषधांची मागणी वाढली असल्याची माहिती सैफी रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मुस्तफा तस्कीन यांनी दिली.
नागरिकांची बदलती जीवनशैली, आहाराच्या बदललेल्या सवयी, फास्ट फूड खाण्याकडे वाढलेला कल यामुळे मागील काही वर्षांमध्ये नागरिकांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. रक्तदाबाचा परिणाम हृदयावरही होत असल्याने हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच अन्नामध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असे भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित औषधांच्या विक्रीमध्ये मागील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्याने जवळपास १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये रक्त पातळ होण्याची औषधे रामिप्रिल, लोसार्टन, टेनसार्टन यासारख्या हृदय व रक्तदाबाशी संबंधित औषधांचा अधिक सहभाग असल्याचे महाराष्ट्र नोंदणीकृत फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांडेल यांनी सांगितले.
करोनानंतर आरोग्याच्या दृष्टीने नागरिक सजग झाले आहेत. करोनानंतर ठरावीक कालावधीमध्ये डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ज्या रुग्णांना कोलेस्टेरॉल आहे किंवा रक्तदाब वाढलेले असल्याचे निदर्शनास की डॉक्टरांकडून आगाऊ काळजी म्हणून रक्त पातळ हाेण्याचे औषध घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या तरुण वयामध्येही हृदयविकाराचे झटके येण्याच्या घटना घडत असल्याने ३० ते ४० या वयोगटातील तरुणांकडून हृदयाची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या गुगल किंवा युट्यूबच्या माध्यमातून लक्षणांची पडताळणी करून औषधे घेण्याचेही प्रमाण वाढले आहे. अशा प्रकरणामध्ये रक्तदाब किंवा हृदयविकारासंदर्भातील आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास कोणती औषधे सोबत ठेवावी, याचाही सल्ला दिला जातो. त्यानुसार औषधांच्या किटमध्ये हृदयविकाराशी संबंधित औषधे ठेवण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.