मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळित झाले. पावसाचा रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. उपनगरीय गाडय़ा शनिवारी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. पावसात झाडे व घरांचे काही भाग कोसळल्याने काही जण जखमी झाली. यात चर्चगेट येथे एक सुरक्षारक्षक झाड कोसळून तर सायन येथे घराची भिंत पडून एक महिला गंभीर जखमी झाली. मुंबईत पुढील २४ तासांत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवली आहे. संततधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे प्रवाशांना सर्वाधिक बसत असून शनिवारी उपनगरीय गाडय़ा उशिराने धावत होत्या. पावसामुळे पश्चिम उपनगरांत ७ ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मात्र वेळीच पाणी काढल्याने वाहतूक कोंडी टळली. मात्र या संततधारेमुळे वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला होता. शहरात महम्मद अली रस्त्यासह काळबादेवी रस्ता, परळ येथील डॉ. आंबेडकर रस्ता, तर पश्चिम उपनगरांतील एस. व्ही. रस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व उपनगरांतील एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत मुंबईत १५.३४ मिमी पावसाची नोंद झाली असून पूर्व उपनगरांत १०.४० मिमी, तर १७.१० मिमी पाऊस पश्चिम उपनगरांत झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच आज सकाळी समुद्रात १०.३६ वाजता मोठी भरती येणार असून या वेळी मोठा पाऊस झाल्यास शहरात पाणी तुंबण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.  गिरगाव येथील भटवाडी येथेही म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळून तीन जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.दरम्यान, शुक्रवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मगर तलाव येथे एक व्यक्ती तलावात बुडाल्याचा प्रकार घडला होता. या व्यक्तीला शोधण्याचे कार्य अग्निशमन दलाकडून चालू असून अद्याप या व्यक्तीचा शोध लागला नाही. शोधकार्यात मदतीसाठी नौदलाला पाचारण करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

१३ झाडे कोसळली

  • शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरांत मिळून १३ झाडे कोसळली.
  • चर्चगेट, आयकर भवन येथे झाड कोसळून खासगी सुरक्षारक्षक जफीर खान (४८) जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • सायन, भंडारवाडा येथे दुपारी एकच्या सुमारास इमारतीमधील छत कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटनांची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall in mumbai
First published on: 31-07-2016 at 00:41 IST