मुंबई-पुणे रेल्वे, रस्ते वाहतूक कोलमडली
दुष्काळी परिस्थितीचे सावट असलेल्या राज्याच्या काही भागांत शुक्रवारी जोरदार वृष्टी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी महामुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत जेमतेम तीन मिलीमीटर पाऊस झाल्याने मुंबईवर पाणीकपातीचे संकट कायम आहे. पावसाने उत्तर महाराष्ट्रात पाच जण मृत्युमुखी पडले, मराठवाडय़ात पुरात अडकलेल्या ६२ लोकांच्या सुटकेसाठी लष्कराला धाव घ्यावी लागली. तर कामशेत येथे लोहमार्गाखालील खडी व भरावच वाहून गेल्यानंतर मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व महामार्गावरही मोठय़ा प्रमाणावर पाणी आल्याने दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीला फटका बसला. रात्री उशिरापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतुकीची स्थिती सुधारलेली नव्हती. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या संपर्कावर परिणाम झाला. विविध गाडय़ा खोळंबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मावळ परिसरात पहाटे सहापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे डोंगर व टेकडय़ांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले. कामशेत येथे लोहमार्गाचा काही भाग पाण्याखाली गेला. त्यानंतर पाण्याच्या वेगामुळे लोहमार्गाखालील भरावच वाहून गेला. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. कल्याणहून खडी असलेली गाडी घटनास्थळी रवाना झाली असली तरी भराव टाकण्यात अडथळे येत होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणारा मार्ग दुरुस्त करून रेल्वेने या मार्गावरूनच दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू केली. त्यामुळे गाडय़ा अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होत्या. पुण्याला जाणारी प्रगती एक्सप्रेस आपल्या नयोजित वेळेपेक्षा तासभर उशिराने सुटली. तर डेक्कन क्वीन ही गाडीही ५० मिनिटे उशिराने रवाना झाली.
पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने डोंगरभागातून वाहणारे पाणी व नदीनाल्यांचे पाणी पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कामशेत, खामशेत, नायगाव, कान्हेफाटा, सातेगाव, मोहितेवाडी, विनोदेवाडी, वडगाव, कुडेवाडा, तळेगाव आदी भागांमध्ये सुमारे चार ते पाच फूट पाणी रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
द्रुतगती मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरल्याने या रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान ओझर्डे व कामशेत बोगदा परिसरामध्ये द्रुतगती मार्गावर दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्पच झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीतच होती.
लष्कराला पाचारण
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी या पावसाळ्यात चौथ्यांदा दुधडी भरून वाहू लागली. औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, िहगोली जिल्ह्यांतील २० तालुक्यात अतिवृष्टी झाली. मात्र, दुष्काळी उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत जेमतेमच पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पुरात अडकलेल्या ६२ जणांना लष्कराने वाचविले. दुधना नदीच्या पुरामुळे ५०० जण विस्थापित झाले आहेत.
मुसळधार पर्वणी..
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यत चोवीस तासात ७१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुंभमेळ्यातील अखेरची तिसरी पर्वणी लाखो भाविकांनी मुसळधार पावसात साधली.