महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या शुक्रवारी शिवाजी पार्कमध्ये घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात ध्वनिप्रदूषणाची पातळी ५० डेसिबलच्या मर्यादेपलीकडे गेल्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने पक्षाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा अवमान केल्यावरून पक्षाला नोटीस बजावण्यात आली असून, बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या शुक्रवारी मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी देताना उच्च न्यायालयाने सभास्थानी आवाज ५० डेसिबलच्या पातळीपलीकडे जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मनसेने हे निर्देश पाळण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, सभा सुरू होण्याआधी वाजतगाजत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आवाजानेच १०० डेसिबलची पातळी ओलांडली होती. राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान आवाजाची पातळी ८५ डेसिबल इतकी होती. आवाज फाऊंडेशनने या ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली असून, त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्याची तक्रार केली आहे. याच मुद्दयावरून न्यायालयाने मनसेला नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court issues notice to mns over voice pollution issue
First published on: 15-04-2016 at 12:56 IST