प्रवासादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास प्रवाशांना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची रेल्वे कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे रेल्वे आपली ही जबाबदारी झटकू शकत नाही, असे ठणकावत किरण मेहता या तरुणीला तात्काळ चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी रेल्वे प्रशासनाला दिले.
चोरलेली बॅग परत मिळवताना चोराशी झालेल्या झटापटीत आणि त्यानंतर गाडीतून खाली पडलेल्या किरणला पाय गमवावा लागला होता. त्यामुळे नुकसानभरपाईच्या रक्कमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमही तिला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अंबाला येथून मुंबईला परतत असताना चोराने किरणची बॅग चोरली. तिने चोराचा पाठलाग केला व त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली. चोराने त्यानंतर बचावासाठी गाडीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेस त्याने किरणलाही स्वत:सोबत खेचले. या अपघातात किरणला पाय गमवावा लागला.
मात्र तिला असे करण्याची गरजच काय होती आणि अपघात उत्तर भारतीय रेल्वेच्या हद्दीत झाला आहे, असा उलट प्रश्न करीत उपचाराचा खर्च देण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला होता.
त्यामुळे तिने अॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने रेल्वे कायद्यानुसार तिला नुकसानभरपाई म्हणून तातडीने चार लाख रुपये देण्याचे आदेश रेल्वेला दिले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘त्या’ तरुणीला चार लाखांची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
अंबाला येथून मुंबईला परतत असताना चोराने किरणची बॅग चोरली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 10-01-2016 at 00:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court orders to pay four lakh to girl