दरवर्षी मुंब्रा येथील मित्तल मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मुशायऱ्या’ला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कात्री लावली. सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू होऊन पहाटे पाच वाजेपर्यंत चालणारा हा ‘मुशायरा’ रात्री जास्तीत जास्त ११ पर्यंत चालेल याची काळजी घेण्याचेही न्यायालयाने ‘मुशायऱ्या’च्या वेळेला कात्री लावताना पोलिसांना बजावले आहे. हा ‘मुशायरा’ आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्यातर्फे आयोजित करण्यात येत असल्याचा आरोप याचिकर्त्यांतर्फे करण्यात आला आहे.
कायद्यानुसार रात्री दहा वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी आहे. मात्र असे असतानाही रात्रभर हा ‘मुशायरा’ सुरू असतो. नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आणि लोकांना त्याचा त्रास होत असल्याचा आरोप करीत अब्दुल मलिक चौधरी यांनी याप्रकरणी जनहित याचिका केली होती. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने रात्री १० नंतर हा ‘मुशायरा’ सुरू ठेवण्यास मज्जाव केला आहे. परंतु आयोजकांकडून विनंती करण्यात आल्यावर जास्तीत जास्त रात्री ११ पर्यंतच तो चालेल याची काळजी घेण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले व याचिका निकाली काढली.