मुंबई : वकील पल्लवी पूरकायस्थ (२५) हिच्या २०१२ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी सज्जाद मुघल याला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. सज्जादला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकार आणि पूरकायस्थ हिच्या वडिलांनी केलेले अपील न्यायालयाने सज्जाद याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना फेटाळले.
सत्र न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये पुरकायस्थ राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षक सज्जादला खून, विनयभंग आणि घरात घुसल्याच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण ‘‘दुर्मीळातील दुर्मीळ’’ श्रेणीत मोडत नसल्याचे नमूद करून सज्जादला फाशीची शिक्षा सुनावण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने त्या वेळी फेटाळली होती. राज्य सरकारने २०१५ मध्ये सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करून सज्जादला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर, पूरकायस्थ हिचे वडील अतनू यांनीही सज्जादला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी फेरविचार याचिका केली होती.
तर सज्जाद यानेही शिक्षेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंंडपीठाने सोमवारी या प्रकऱणी निर्णय देताना सज्जादसह राज्य सरकारचे अपील आणि पूरकायस्थ हिच्या वडिलांची याचिकाही फेटाळून लावली. तसेच, सत्र न्यायालयाचा सज्जाद याला जन्मठेप सुनावण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला.
प्रकरण काय ?
पल्लवी हिचा ९ ऑगस्ट २०१२ रोजी वडाळा येथील तिच्या घरात गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सज्जादने आधी तिच्या घरातील वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे तिने त्याच्यासह अन्य एका सुरक्षा रक्षकाला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी संपर्क साधला. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सज्जादने या संधीचा फायदा घेतला आणि तिच्या घराची चावी चोरली. त्यानंतर त्याच रात्री त्याने तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला व नंतर तिचा खून केल्याचा आरोप होता.
