उमाकांत देशपांडे, मुंबई

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम वेगाने मार्गी लावण्यात आल्याने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जागेचा ताबा हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनकडून १ मार्चपासून घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजकीय रणधुमाळीसाठी बीकेसी मैदान राजकीय पक्षांना उपलब्ध होऊ शकणार नाही. शिवसेना-मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार विरोध असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्याने या मैदानाच्या परिसरातील सेवा वाहिन्या (युटिलिटी लाइन्स) स्थलांतरित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या मार्गातील भूसंपादन व अन्य अडथळे राजकीय विरोध डावलून दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत. आगामी निवडणुकीत विरोधक व शिवसेनेकडून या प्रकल्पावरून  टीकास्त्रही सोडले जाईल. तरीही फडणवीस यांनी  हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावले टाकली आहेत. बीकेसीतील जागेत भूमिगत स्थानक उभारले जाणार असून त्यासाठी ०.९ हेक्टर जागा देण्यात आली आहे. तर याच जागेत मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) उभारले जाणार आहे. जोपर्यंत स्थानकाचा आराखडा अंतिम होऊन काम सुरू होत नाही, तोपर्यंत केंद्राच्या इमारतीचे कामही सुरू होऊ शकणार नाही. आता एमएमआरडीएकडून कॉर्पोरेशनला या जागेचा ताबा १ मार्चपासून दिला जाईल. शिवसेना-मनसेच्या आंदोलनाची शक्यता असली तरी कामे सुरू करण्यात आली आहेत.

बीकेसीतील भव्य मैदानांचा वापर प्रदर्शने, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि निवडणूक काळात प्रचारसभांसाठी केला जातो. आता पुढील महिन्यापासून तो बंद होईल. बीकेसीतील काही जागा मेट्रो प्रकल्पासाठीही देण्यात आल्याने आता राजकीय सभा गोरेगाव येथील एनएसी ग्राऊंड, घाटकोपर येथील सोमय्या मैदान व अन्य मैदानांवर घ्याव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रात १०४ पैकी ६१ गावांमध्ये, तर गुजरातमधील २०० गावांपैकी १७६ गावांमध्ये संयुक्त मोजणीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स) सुषमा गौर यांनी सांगितले. बीकेसीतील भूमिगत स्थानकासाठीची जागा मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कॉर्पोरेशनला हस्तांतरित करण्याबाबतचा करार फेब्रुवारी २०१८ मध्ये करण्यात आला आहे. या जागेचा वापर प्रदर्शने, सभा आदींसाठी फेब्रुवारी २०१९ पर्यंत करण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी देण्यात आली आहे. भूमिगत स्थानकाच्या वर मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारले जाणार असल्याने त्याचा सुधारित तांत्रिक आराखडा तयार करण्याचे काम कॉर्पोरेशन व एमएमआरडीएच्या तंत्रज्ञांकडून सुरू आहे. या जागेतील सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी कॉर्पोरेशनने संबंधितांना सूचना केली असून हे काम सुरू झाले आहे. भूमिगत स्थानकाच्या उभारणीचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गौर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

उच्चदाब पारेषण वाहिन्यांचेही स्थलांतर

बुलेट ट्रेनच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या महाराष्ट्र व गुजरातमधील २२० केव्ही व ४०० केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्याही स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी नवी दिल्लीत सामंजस्य करार करण्यात आला.