‘आवडेल तिथे प्रवास’ या अंतर्गत देण्यात येणारा राज्य परिवहन महामंडळाचा पास २१ नोव्हेंबरपासून महागणार आहे. चार व सात दिवसांसाठी देण्यात येणाऱ्या या पासाच्या रकमेत किमान १० रुपये आणि कमाल ४५ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. मात्र यापूर्वी देण्यात आलेले आणि २१ नोव्हेंबरपासून चालू होणारे किंवा त्यादिवशीच चालू असलेले पास त्यांची मूदत संपेपर्यंत वैध असतील. या पासधारकांकडून दरातील फरक वसूल करून घेतला जाणार नाही.
दीर्घ प्रवासावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर म्हणून एसटीने ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ अशी पास योजना सुरू केली. या पास योजनेचा लाभ अनेक प्रवासी घेतात. एसटीने नुकत्याच केलेल्या दरवाढीत या पासाचे शुल्क वाढवण्यात आले नव्हते. मात्र आता एसटीने या पासाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पास चार आणि सात दिवसांसाठी दिले जातात. साधी, निमआराम आणि आंतर-राज्य अशा तीन वेगवेगळ्या गाडय़ांसाठी वेगवेगळे पास असतात.
एसटीने वाढवलेल्या दरांप्रमाणे आता साध्या गाडीच्या चार दिवसांच्या पाससाठी गर्दीच्या हंगामात ७३५ ऐवजी ७५५ रुपये मोजावे लागतील, तर कमी गर्दीच्या हंगामात ६८० रुपयांऐवजी ७०० रुपये घेतले जातील. हाच दर निमआराम किंवा हिरकणी गाडय़ांसाठी ८५० ऐवजी ८७० रुपये आणि ७८५ ऐवजी ८०५ रुपये एवढा असेल. आंतर-राज्य गाडय़ांसाठी चार दिवसांचा पास गर्दीच्या हंगामात ९१५ ऐवजी ९४० रुपये आणि कमी गर्दीच्या हंगामात ८५० ऐवजी ८७० रुपये आकारण्यात येणार आहेत.
सात दिवसांच्या पासाचे दरही याच प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. साध्या गाडय़ांसाठी सात दिवसांचा पास गर्दीच्या हंगामात आधी १२८५ रुपयांत मिळत होता. आता या पाससाठी १३२० रुपये लागणार आहेत. कमी गर्दीच्या हंगामात हाच पास ११८५ ऐवजी १२२० रुपयांत मिळेल. निमआराम गाडय़ांसाठी गर्दीच्या हंगामात १४८५ रुपये घेतले जात होते. मात्र आता १५२० रुपये घेतले जातील. तर कमी गर्दीच्या हंगामात याच गाडय़ांसाठी १३७० रुपयांऐवजी १४०५ रुपये घेतले जातील.