नवी मुंबई पालिकेने वाशी येथील मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालयातील काही भाग हिरानंदानीसारख्या खासगी रुग्णालयाला दिल्याबाबत सिडकोने हा भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीसही पालिकेला पाठवण्यात आली आहे. पालिकेने मात्र याविरोधात राज्य सरकारकडे धाव घेत रुग्णालय सुरू ठेवण्याची गळ घातली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सरकारला चार आठवडय़ांत पालिकेच्या अर्जावर अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेने ३० कोटी खर्च करून पाच मजल्याचे मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालय बांधले. काही वर्षांनी पालिकेने या इमारतीतील १ लाख २० हजार चौरस फूट मोकळा भाग ‘हिरानंदानी हेल्थकेअर’ या रुग्णालयाला भाडेपट्टय़ावर देऊन टाकला. हिरानंदानी रुग्णालयाने नंतर ‘फोर्टिज’ रुग्णालयाला बरोबर घेऊन या ठिकाणी नऊ वर्षांपूर्वी ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू केले. पालिकेच्या या कराराविरोधात संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.