हिट अँड रनप्रकरणात अभिनेता सलमान खानचा पाय आणखी खोलात गेला आहे. अपघाताच्यावेळी सलमान खान दारुच्या नशेतच होता आणि त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते, अशी साक्ष फॉरेन्सिक तज्ज्ञांनी बुधवारी सत्र न्यायालयासमोर दिली आहे.
खटल्याच्या सुनावणीत जे.जे. रुग्णालयाचे फॉरेन्सिक तज्ज्ञ डी.के. बालाशंकर यांनी साक्ष दिली. रक्तामध्ये सुमारे ३० एमजीपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण हे सामान्य मानले जाते. पण, अपघाताच्या वेळी सलमानच्या रक्तात हे प्रमाण तब्बल ६२ एमजी होते अशी माहिती बालाशंकर यांनी न्यायालयाला दिली आहे. यावरुन सलमान दारुच्या नशेत होता हे स्पष्ट होऊ शकते. यामुळे सलमान खान हा गोत्यात आला असून आणखी साक्षीदारांची साक्ष अजूनही सुरु आहे. मागील वेळेस सुनावणी दरम्यान सलमान गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यावेळी सलमान सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित होता.
सलमान खानवर मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवून पाच जणांना धडक दिल्याचा आरोप आहे. २८ सप्टेंबर २००२ मध्ये वांद्रे येथे झालेल्या या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली खटला सुरु आहे. २४ नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने डिसेंबर अखेरपर्यंत हा खटला निकाली काढण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले होते.