निवडणुका जवळ आल्या, जागा वाटपाचे लवकर काय ते ठरवा, अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गप्पगार बसलेल्या शिवसेना-भाजपला जागे करुन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरपीआयचा योग्य तो सन्मान केला जात नाही, असा काहीसा नाराजीचा सूरही लावला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने मात्र अजून त्याची दखल घेतलेली नाही.
मात्र आरपीआयचा सन्मान कसा करायचा ही मोठी जोखीम या दोन्ही पक्षावर असून प्रत्यक्ष जागा वाटपातच त्याचा खरा कस लागणार आहे.
आंबेडकरी समाजाच्या विरोधाची पर्वा न करता आठवले यांनी शिवसेना-भाजपशी युती केली. त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा फटका आरपीआयला बसला. परंतु त्याचीही चिंता न करता किंबहुना काही जुने कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्यानंतरही आठवले यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय कायम ठेवला.
या पूर्वी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणी अगदी किरकोळ व पडेल जागा आरपीआयच्या माथी मारायचे. परिणामी गेल्या वीस वर्षांत आरपीआयचा म्हणून कधीही कुणी उमेदवार विधानसभेवर निवडून आला नाही. त्याच काँग्रेसी नीतीचा सेना-भाजपने अवलंब करुन नये, अशी आठवले यांची इच्छा आहे. परंतु त्याला सेना-भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
आठवले यांनी लोकसभेच्या चार व विधानसभेच्या ३० ते ३५ जागांची अपेक्षा केली आङे. लोकसभेसाठी दक्षिण-मध्य मुंबई, कल्याण, लातूर व रामटेक या चार जागांची मागणी केली आहे. आता मागील निवडणुकीत कल्याण ही तर शिवसेनेने जिंकलेली जागा आहे.
दक्षिण-मध्य मुंबईत पराभव झाला असला तरी सेनेचा प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे. लातूर व रामटेक हे राखीव मतदारसंघ आहेत. त्यामुळे आठवले यांना जागा सोडताना सेना-भाजपपुढेही मोठा पेच निर्माण होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
आरपीआयच्या सन्मानाचा सेना-भाजपवर भार
निवडणुका जवळ आल्या, जागा वाटपाचे लवकर काय ते ठरवा, अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गप्पगार बसलेल्या शिवसेना-भाजपला जागे करुन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरपीआयचा योग्य तो सन्मान केला जात नाही, असा काहीसा नाराजीचा सूरही लावला.
First published on: 28-04-2013 at 03:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honour of rpi weight on sena bjp